पुण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील घाऊक बाजारामध्ये शेतकरी आपला फुलांचा माल विक्रीसाठी घेऊन आले आहेत. ओल्या फुलांना फार कमी दर मिळाला असून कोरड्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलाला 100 ते 120 रू. किलो असा भाव मिळाला आहे. दसऱ्याच्या सणाला सर्वाधिक मागणी झेंडू, शेवंती, गुलछडी आणि अष्टर या फुलांना असते. मार्केट यार्डातील फूल बाजारात दसऱ्याच्या दोन- तीन दिवस आधीपासूनच झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली. पुण्याच्या या मार्केट यार्डामध्ये पुण्यासह सोलापूर, धाराशिव, बीड आणि हिंगोली परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीस पाठवला आहे.
advertisement
दसऱ्यामुळे पुण्याचे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड रात्रं- दिवस सुरू राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची आणि गिर्हाईकांची ये- जा सुरू राहणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अवकाळी पावसाचा झेंडूच्या फुलाच्या क्वालिटीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. अनेक घरगुती ग्राहक फुलांची खरेदी करण्यासाठी बुधवारी बाजारामध्ये येतील. त्या अंदाजे बाजारामध्ये फुलांची आवाक वाढत जाईल. जशी ग्राहकांची मागणी वाढत जाईल, त्याप्रमाणे बुधवारी बाजारात झेंडूची आवक आणखी वाढत जाईल. यंदा झेंडूचे दर तेजीत राहणार असून, सुक्या झेंडूला चांगले दर मिळणार आहेत.
किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूचे दर 100 ते 150 रूपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळीपासूनच फुले खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डामध्ये आणि परिसरामध्ये ग्राहकांची आणि व्यापारांची एकच गर्दी असणार आहे. ग्राहकांसोबतच किरकोळ व्यापारांचीही बाजारामध्ये मोठी गर्दी असणार आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलाला चांगले दर मिळताना दिसत आहेत. सुक्या झेंडूच्या फुलाला 100- 120 रूपये किलो इतका दर, ओल्या झेंडूच्या फुलाला 30- 40 रूपये किलो इतका दर, गुलछडीच्या फुलाला 500- 700 रूपये किलो इतका दर आणि शेवंतीच्या फुलाला 100- 250 रूपये किलो इतका दर आहे.