उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितलं की, बिबटे खाद्याच्या कमतरतेमुळे बिथरले असल्याने ते मानवी वस्तीत प्रवेश करतात. त्यांना हा नवा अधिवास मिळाल्यास शहरांमधील त्यांचे प्रवेश कमी होतील.
या प्रस्तावित जंगलांसाठी ३० ते ५० एकर क्षेत्राच्या वन विभागाच्या मोकळ्या जागा निवडण्यात आल्या आहेत. सध्या या जागा साधे कुरण किंवा विस्तीर्ण पठार स्वरूपात आहेत. जुन्नर, मंचर आणि शिरूर तालुक्यात पाण्याचे मुबलक साठे आणि उसाची शेती असल्याने या भागांत बिबट्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपरखेड, जांबूत या गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात तीन बळी गेल्यानंतर या जंगलनिर्मितीच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे.
advertisement
Pune Crime: हॉर्न वाजवल्यानं सटकली; रस्त्यातच तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शेवटी गळाच दाबला
या योजनेनुसार, सर्वप्रथम संपूर्ण जागा तारेचे कुंपण घालून पूर्णपणे बंदिस्त केली जाईल. त्यानंतर आतल्या परिसरात उत्तम दर्जाचे वेगाने वाढणारे गवत आणि वेगवेगळ्या देशी वृक्षांची मोठी रोपे लावली जातील. याचबरोबर वेली प्रजाती आणि दाट वृक्षराजीची लागवड करून नैसर्गिक पाणवठे तयार केले जातील. या कृत्रिम लागवडीची योग्य निगराणी केल्यास लवकरच त्यात नैसर्गिक वाढ होईल आणि कालांतराने साप, विंचू, ससे आणि पक्षी यांचाही नैसर्गिक अधिवास तिथे निर्माण होईल. जंगल तयार झाल्यावर, वन विभाग रेस्क्यू केलेल्या (पकडलेल्या) बिबट्यांना या नवीन बंदिस्त जंगलात सोडण्याचा विचार करत आहे, जेणेकरून त्यांना बाहेर न पडता नैसर्गिक खाद्य मिळेल आणि त्यांचा जीवनक्रम सुरक्षित राहील.
जुन्नरमधील माणिकडोह येथे सध्या ४५ बिबटे बंदिस्त संवर्धन केंद्रात आहेत, मात्र त्यापेक्षाही हे तयार जंगल बिबट्यांसाठी अधिक उपयुक्त आणि मानवी वस्तीसाठी सुरक्षित ठरेल, असा वन अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.
