Pune Crime: हॉर्न वाजवल्यानं सटकली; रस्त्यातच तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शेवटी गळाच दाबला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी कंबरपट्ट्याच्या बक्कलने आणि लाथाबुक्क्यांनी वरुण यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड रस्त्यावर गाडीला कट मारल्यानंतर हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या टोळक्याने एका तरुणावर खुनी हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना थेरगाव फाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या इतर पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २५ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली. वरुण किशोर टोपणे (वय २०, रा. अहिंसा चौक, चिंचवड) असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. वरुण यांनी बुधवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कमलेश विठ्ठल बालघरे (वय ३६) आणि योगेश विठ्ठल बालघरे (वय ३९, दोघेही रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव) अशी या घटनेतील आरोपींची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. थेरगाव फाटा बसथांब्याजवळ आरोपी कमलेश बालघरे याने फिर्यादी वरुण टोपणे यांच्या वाहनाला भरधाव वेगात धोकादायक पद्धतीने कट मारला. यावर वरुण यांनी हॉर्न वाजवून नाराजी व्यक्त केली.
advertisement
हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून कमलेशने वरुणची गाडी रस्त्यात अडवली आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर कमलेशने तातडीने त्याचे चार ते पाच साथीदार बोलावून घेतले. या सात जणांच्या टोळक्याने मिळून वरुण टोपणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी कंबरपट्ट्याच्या बक्कलने आणि लाथाबुक्क्यांनी वरुण यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वरुण टोपणे गंभीर जखमी झाले. वरुण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कमलेश आणि योगेश बालघरे यांना अटक केली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. वाकड पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. क्षुल्लक वादातून खुनी हल्ला केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 28, 2025 7:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: हॉर्न वाजवल्यानं सटकली; रस्त्यातच तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शेवटी गळाच दाबला


