मेट्रो प्रवासाचा आकडा 5 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता
सध्या मेट्रोचा दैनंदिन प्रवासाचा आकडा सुमारे 2 लाख 15 हजार इतका आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या तब्बल 5 लाखांहून अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी वाढणार असल्याचा अंदाज आहे. गणेशभक्तांसह नियमित प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोकडून काही विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
advertisement
या आहेत पुणे मेट्रोच्या महत्त्वाच्या सूचना
पिंपरी–चिंचवड मनपा ते स्वारगेट (मार्गिका 1) भाविकांनी कसबा पेठ स्थानक वापरावे. येथून पायी चालत जवळील मानाच्या गणपतींचे दर्शन घेता येईल.
वनाझ ते रामवाडी (मार्गिका 2) प्रवाशांनी पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजी उद्यान किंवा डेक्कन जिमखाना स्थानक निवडावे.
मंडई स्थानकावर उतरणे टाळावे, कारण येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. तिकीट खिडकीवरील रांगा कमी करण्यासाठी डिजिटल तिकीट, व्हॉट्सअॅप तिकीट किंवा ‘वन पुणे कार्ड’ वापरावे.
वृद्ध, महिला आणि गरजू प्रवाशांना लिफ्टमध्ये प्राधान्य द्यावे. इतरांनी जिने व एस्केलेटरचा वापर करावा. स्थानकांच्या प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडताना शिस्त पाळावी व अनावश्यक गर्दी टाळावी.
सर्व भाविक व प्रवाशांनी पुणे मेट्रो, पोलीस आणि महापालिकेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, ज्यामुळे गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी ठरेल, असं आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आलं आहे.