यातील सर्वात मोठी चोरी कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीत घडली. येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेनं कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ८ डिसेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांसोबत गोव्याला पर्यटनासाठी गेल्या होत्या. याच काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटं उचकटून चोरट्यांनी आत ठेवलेले सात लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. महिला गोव्याहून परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
advertisement
पुण्यातील आयटीच्या तरुणाचा प्रताप; विमानतळावर उघडली बॅग, आत दिसलं असं काही की पोलिसही थक्क
दुसरीकडे, याच दरम्यान चोरट्यांनी हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात असलेल्या एका सोसायटीतील बंद फ्लॅटला लक्ष्य केलं. येथेही कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या घटनेबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिक घराला कुलूप लावून बाहेरगावी जातात, अशा बंद घरांवर पाळत ठेवून चोरटे हे गुन्हे करत असल्याचं या घटनांवरून स्पष्ट होतं. नागरिकांनी प्रवास करताना शेजाऱ्यांशी संपर्क साधून घर सुरक्षित ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून पुन्हा एकदा करण्यात आलं आहे.
