पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीला सरकारने फेब्रुवारी 2024 मध्येच मान्यता दिली होती. हा महामार्ग सुरत – चेन्नई महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचा इतर राज्यांतील वाहनचालकांना फायदा होणार आहे. महामार्गाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) आणि व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्य सरकारकडे सादर केला जाईल.
advertisement
ठाण्यातील वाहतूक कोंडीची कटकट संपणार, नवी मुंबई ते कल्याण प्रवास सुसाट होणार
कसा असेल औद्योगिक मार्ग ?
पुणे ते नाशिक या औद्योगिक द्रुतगती महामार्गावर नद्या आणि नाल्यांवर 12 मोठे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंबळी, चाकण, पाबळ; तसेच अहिल्यानगर, नाशिकमधील राजुरी, खंडारमाळ, साकूर, माची, कासारे या 9 ठिकाणी इंटरचेंज असेल. महामार्गावर प्रवेश करताना किंवा मार्गावरून बाहेर पडताना या इंटरचेंजचा उपयोग होणार आहे. महामार्गासाठी 28 हजार 429 कोटींचा खर्च अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होईल.
तीन वर्षांत काम पूर्ण होणार
पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची लांबी 133 किलोमीटर असणार असून हे काम 3 वर्षांत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचा समावेश असेल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा महामार्ग प्रस्तावित आहे.
दरम्यान, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. कृषी, अवजड उद्योग, लघु आणि मध्यम उद्योग; तसेच आयटी कंपन्यांच्या दृष्टीने देखील ही महत्त्वाची शहरे आहेत. त्यासाठीच हाती घेण्यात आलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात अनेक अडथळे असून, हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मात्र, या महामार्गाला चालना मिळाल्यास पुणे-नाशिक दरम्यानचे अंतर तीन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
