हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक 3 मधील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय. ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावलं, असा खुलासा या दोघींनी केला आहे. यादरम्यान बराच वेळ आत कोंडलेली लहान मुलं मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होती. बुधवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
advertisement
अकरा वाजता हिंजवडीच्या ग्रामपंचायतीतून त्यांना फोन आला. त्यामुळे बैठकीसाठी गेल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, बैठकीला जाताना एकीने अंगणवाडीतच थांबणं गरजेचं होतं. तरी या दोघींनी बाहेरून लॉक लावलं आणि मुलांना आतच कोंडून ग्रामपंचायतीमध्ये गेल्या.
उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना सांगितली. तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीनं अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. काही वेळासाठी का होईना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं, धोकादायक आणि संतापजनक आहे. कारण ही सर्व मुलं ५ वर्षाखालील आहेत आणि तिथे त्यांच्यासोबत कोणीही इतर जबाबदार व्यक्ती नव्हती.
हा प्रकार किती भयंकर होता, हे व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होतंय. आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र, या दोघींवरही कारवाई करू असं आश्वासन गिराम यांनी दिलं आहे.
