गावात बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे मुलींच्या पालकांकडून या भागात मुली देण्यास सरळ नकार दिला जात आहे. परिणामी वेल सेटल असूनही अनेक तरुण अविवाहित राहिले आहेत. आई-वडील आपल्या लेकरांच्या संसाराच्या गाठी बांधण्यासाठी चिंतेत आहेत, तर मुलंही लग्नाची स्वप्नं पाहत असताना निराशेच्या गर्तेत सापडली आहेत.
काठीला घुंगरू बांधा, बॅटरी सोबत ठेवा, पुण्यातील या भागात धोका वाढला, धक्कादायक कारण समोर...
advertisement
गेल्या काही महिन्यांत या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जनावरे, पाळीव प्राणी आणि माणसांवरही हल्ले झाले आहेत. काहींचा जीवही गेला आहे. रात्रीच नव्हे तर आता दिवसा देखील बिबट्या वावरताना दिसतो, यामुळे नागरिकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटते. शेतीकाम, गुरे चारणं किंवा शाळेत जाणं प्रत्येक हालचालीवर सावलीसारखी बिबट्याची भीती आहे.
या भीतीमुळे सामाजिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक गावांमध्ये विवाहाचे प्रस्ताव थांबले असून मुलींचे पालक बिबट्यांच्या गावात मुलगी देणार नाही असा ठाम निर्णय घेत आहेत. काही ठिकाणी ठरलेली लग्नं शेवटच्या क्षणी मोडली गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. परिणामी या भागातील तरुणांची लग्नं रखडली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, बिबट्यांच्या दहशतीमुळे मुलांमध्ये आणि महिलांमध्येही मानसिक ताण निर्माण झाला आहे. गावातील शाळांमध्ये उपस्थिती कमी झाली आहे, तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शहरातून गावाला येणारी भाची-बांधव मंडळी सुद्धा आता मामाचं गाव नको असं म्हणू लागली आहेत.
याच दरम्यान कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क परिसरात उच्चभ्रू वसाहतीत घुसलेल्या बिबट्याला दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान दोन पोलीस आणि दोन वनअधिकारी जखमी झाले.
या सर्व घटनांमुळे बिबट्यांचा वाढता वावर राज्यभर गंभीर चिंता निर्माण करत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, सुरक्षिततेसाठी पिंजरे, सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील ही भीती केवळ प्राणघातक नाही, तर सामाजिक जीवनावरही गडद सावली टाकणारी ठरत आहे.






