पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या तपासणीत काही आगारांमध्ये टाईमकिपर आणि मदतनीस कर्मचारी चालक आणि वाहकांची हजेरी फोनवरून घेत असल्याचे उघड झाले. सकाळ-दुपारच्या शिफ्टमध्ये ही पद्धत वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने ती अयोग्य आणि गंभीर मानली. त्यामुळे आता मोबाईल हजेरीची प्रथा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
advertisement
सतीश गव्हाणे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, आगार व्यवस्थापक, टाईमकिपर आणि मदतनीस सेवकांनी यापुढे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या चालक-वाहकांचीच हजेरी घ्यावी. नियोजित वेळेत कामावर आलेल्यांनाच गाड्यांवर पाठवावे. नियम मोडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
पीएमपीत अनेकदा असे दिसून आले आहे की, काही कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांची हजेरी फोनवर घेण्यात येते. यामुळे वेळेचे आणि शिस्तीचे उल्लंघन होत होते. तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रक्रियेची चौकशी केली आणि तत्काळ बदल करण्याचा निर्णय घेतला. या आदेशामुळे वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती व्यवस्थित नोंदवली जाईल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी काही वेळा मोबाईल हजेरी पद्धतीमुळे गैरसोयी निर्माण झाल्या होत्या. उशिरा आलेल्या चालक-वाहकांना देखील फोनवर हजेरी लावून दिली जात होती, ज्यामुळे वेळेवर ड्युटीला आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. यावर उपाय म्हणून आता प्रत्यक्ष हजेरी प्रणाली कडकपणे लागू केली जाणार आहे.
पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व आगारांनी हा नियम काटेकोरपणे पाळावा. हजेरीसंदर्भातील कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल.
या निर्णयामुळे पीएमपीमध्ये शिस्तबद्धता आणि कार्यक्षमतेला चालना मिळेल. प्रवाशांना वेळेत आणि नियमित सेवा देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.