या संदर्भात सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी माहिती दिली की, रक्षक चौकात सध्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पाच पदरी रस्ता अचानक एका लेनमध्ये रूपांतरित होतो आणि तिथे मोठी वाहतूक कोंडी होते. औंध मिलिटरी स्टेशनच्या बाजूला फूटपाथ मोठा असून रस्ता अरुंद आहे. त्यामुळे घाईत असलेले वाहनचालक फूटपाथचा वापर करतात. "काही नागरिक स्वतःहून पोलिसांना मदत करत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करतात, आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो. फूटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांवर आम्ही नियमित कारवाई करत आहोत," असे पाचोरकर यांनी सांगितले.
advertisement
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पुणेकर वाहनचालकांसह प्रशासनावरही कडक शब्दात टीका केली आहे. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, "एकेकाळी इंग्रजांना वाटायचे की ते आपल्याला 'सुसंस्कृत' करत आहेत. आज एका परदेशी व्यक्तीला आपल्याला नियम शिकवावे लागत आहेत, हे पाहून कोणत्याही स्वाभिमानी वाहतूक आयुक्तांना लाज वाटली पाहिजे."
व्हायरल व्हिडिओमुळे रक्षक चौकातील वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांची बेफिकिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
