नितीन शिंदे यांनी वडील मधुकर आणि आई ताराबाई यांच्या नावावरून 20222 साली ‘मधुतारा फाउंडेशन’ स्थापन केले. या फाउंडेशनने अल्पावधीत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य सुरू केलं आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, दिव्यांगांसाठी सहाय्य, रोजगार उपलब्ध करून देणं यासारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली ही संस्था सध्या पुण्यातील 450 हून अधिक सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहे.
advertisement
हमाल झाला समाजसेवक
नितीन शिंदे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी हमालीचं काम सुरू केलं. नंतर वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची रिक्षा घेतली. सुरुवातीला जीवन जगण्यासाठी संघर्षच होता. पण बहिणीच्या आजारपणाचा अनुभव घेतल्यानंतर समजलं की गरजू लोकांसाठी योग्य मार्गदर्शन आणि मदतीची नितांत गरज आहे. त्यातूनच 'मधुतारा'ची संकल्पना जन्माला आली, असं शिंदे सांगतात.
दिव्यांगांना आधार
फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना व्हीलचेअर, वॉकर, स्टिक, कमोड चेअर्स यांचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच हात किंवा पाय नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत’ यासारख्या शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून, मोफत उपचार मिळवून देण्याचं काम या संस्थेद्वारे केलं जातं. अशा उपचारांसाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता, रुग्णालयांशी समन्वय यांसाठीही संस्था कार्य करते.
शिक्षणासाठी सहकार्य
शिक्षण अर्धवट राहिलेल्या मुलींना बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत दिली जाते. विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्गदर्शन आणि स्वरोजगारासाठी संस्थेकडून साहाय्य दिलं जातं. स्वतःची रिक्षा चालवत मिळवलेली कमाई आणि समाजातील काही संवेदनशील व्यक्तींचा पाठिंबा याच्या जोरावर ते हे कार्य पुढे नेत आहेत, अशी माहिती नितीन शिंदे यांनी दिली.





