ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून मागवलेला खराब माल परत करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणं एका ज्येष्ठ महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरांनी याच संधीचा फायदा घेत महिलेच्या बँक खात्यातून 79 हजार 208 रुपये काढून घेतले. या फसवणुकीची तक्रार नारायण पेठेतील या ज्येष्ठ महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
Pune News : एका दिवसासाठी घेतली; वर्ष झालं तरी मित्राची आलिशान मर्सिडीज परत करेना तरुण, शेवटी अटक
advertisement
१५ नोव्हेंबर रोजी संबंधित ज्येष्ठ महिलेनं 'ब्लिंकिट' (Blinkit) ॲपवरून ४५० रुपयांची फळं आणि भाज्या मागवल्या होत्या. माल खराब निघाल्याने तो परत करून 'रिफंड' मिळवण्यासाठी महिलेनं ॲपच्या अधिकृत साईटऐवजी गुगलवर 'ब्लिंकिट कस्टमर केअर'चा नंबर शोधला. गुगलवर सापडलेला तो नंबर प्रत्यक्षात सायबर चोरांचा होता. महिलेनं कॉल करताच फोन उचलणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचं सांगून रिफंड मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
रिफंड मिळवण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी काही वेळातच महिलेच्या बँक खात्यातून 79,208 रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच, महिलेनं तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये ही भर पडली आहे.
विश्रामबाग पोलीस या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत. नागरिकांनी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी, कोणत्याही ॲपच्या कस्टमर केअरसाठी गुगल सर्चवर अवलंबून न राहता, फक्त ॲपमधील किंवा अधिकृत वेबसाइटवरील नंबर वापरावेत. तसेच अनोळखी व्यक्तीला कोणतीही गोपनीय माहिती किंवा ओटीपी (OTP) देऊ नये, असे आवाहन पोलीस करत आहेत.
