300 हून अधिक देशी वृक्षांचे बीजसंकलन
गेल्या 17 वर्षांपासून पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या वैष्णवी पाटील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. या कार्यासाठी त्यांनी चार वर्षांपूर्वी ‘आरंभ फाउंडेशन’ ची स्थापना केली. पर्यावरणीय बदल आणि वृक्षतोडीमुळे दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी त्यांनी ‘देशी वृक्ष बीज बँक’ उभारली आहे. मॉर्निंग वॉक दरम्यान रस्त्याच्या कडेला आढळणाऱ्या देशी वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यापासून या उपक्रमाची सुरुवात झाली. आजपर्यंत वैष्णवी पाटील यांनी तीनशेहून अधिक दुर्मीळ वृक्षांचे बीज संकलन केले आहे. केवळ बीजसंकलनापुरतं न थांबता, त्यांनी हजारो रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्याचं कार्यही हाती घेतलं आहे.
advertisement
नि:शुल्क कोट्यवधी बियाण्यांचे वाटप
वैष्णवी पाटील यांनी महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यांतील निसर्गप्रेमी, वन विभाग आणि विविध सामाजिक संस्थांना नि:शुल्क कोट्यवधी बियाण्यांचं वाटप केलं आहे. सिद्धबेट केळगाव (आळंदी), आर्मी कॅम्प जम्मू-काश्मीर, पुणे, वनविभाग हडपसर, ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगाव, बेलदारवाडी, सैनिक टाकळी यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुद्धा केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पहिली बीजतुला केली आहे. त्याचबरोबर, झाडांच्या नावांची पहिली वर्णमाला तयार करण्याचंही वैशिष्ट्यपूर्ण कार्य या संस्थेने केलं आहे. वैष्णवी पाटील यांना बीज संकलनाची प्रेरणा वनश्री रघुनाथ ढोले यांच्याकडून मिळाली, तर अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या कामात मार्गदर्शन केले. आता त्यांना भव्य बीज बँक आणि रोपवाटिका उभा करण्याची आहे.