अवघ्या अडीच तासात ठाण्यातून पुण्यात
12 मार्चला काटेकोर नियोजन करत ठाणे येथील किम्स रुग्णालयातून दात्याचे फुफ्फुस पुण्यात आणण्याची मोहीम राबवण्यात आली होती. डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी 10.15 वाजता ठाण्यातून रवाना झाले. ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने हे फुफ्फुस अवघ्या 2 तास 25 मिनिटांत, म्हणजे दुपारी 12.40 वाजता पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पोहोचवण्यात आले. डॉक्टर, पोलीस आणि प्रशासन यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया जलद गतीने पार पडली. गंभीर रुग्णावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वेळेत करणे शक्य झाले.
advertisement
या मोहिमेसाठी ठाणे आणि पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोलिस विभागाच्या समन्वयातून विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप चव्हाण, राहुल जाधव, हेमांगिनी पाटील आणि रोहित कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली. फुफ्फुस सुरक्षितपणे पुण्यात पोहोचवण्यासाठी डॉक्टर, पोलिस, सहाय्यक कर्मचारी तसेच वाहतूक विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीममध्ये डॉ. आशिष डोळस, डॉ. राहुल केंद्रे, ओटी नर्स वाल्मिक, परफ्युजनिस्ट निखिल लाकी, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर अरुण आणि तंत्रज्ञ विशाल पाटील यांचा समावेश होता. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गंभीर रुग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.






