संतोष पाटोळे यांनी सांगितले की, ते गेल्या 8 वर्षांपासून SLB कंपनीत काम करत आहेत. पण याच कंपनीने मला थायरॉईड नोड्यूल इस्थमस कॅन्सर झाला, या कारणावरून कामावरून काढून टाकलं. कंपनीने एप्रिल महिन्यात हेल्थ कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये मला कॅन्सर झाल्याचे समजले.
advertisement
त्यानंतर पुढील उपचारांसाठी मी मे आणि जून महिन्यात शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी वैद्यकीय रजा घेतली. त्या काळात कंपनी माझा वैद्यकीय खर्च करत होती. उपचारानंतर तब्येत स्थिर झाल्यावर 1 जुलै रोजी डॉक्टरांकडून फिटनेस प्रमाणपत्र घेतले आणि कामावर परतण्याची तयारी सुरू केली. पण कामावर रुजू होण्याच्या आधीच, 23 जुलैला कंपनीने अचानक कामावरून काढून टाकल्याचे पत्र दिले.
कंपनीने कामावरून काढण्याचं कारण काय दिलं?
संतोष पाटोळे यांनी सांगितलं की, कंपनीने त्यांच्यावर एका प्रोजेक्टमध्ये 2.5 ते 3 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे खोटे कारण देत त्यांना कामावरून काढले. प्रत्यक्षात तो प्रोजेक्ट अजून कार्यान्वित झालाच नव्हता.
नोकरी गमावल्यामुळे संतोष पाटोळे यांच्यावर महागड्या उपचारांचा आर्थिक आणि मानसिक ताण वाढला आहे. कंपनीने वैद्यकीय मदत थांबवल्याने त्यांनी न्याय मिळवण्यासाठी कंपनीच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. आम्ही कंपनीशी संपर्क साधला, पण अद्याप कोणतीही प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.





