परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी गाड्यांची योग्य देखभाल करून त्या चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
Ganeshotsav 2025: कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात एसटीची विशेष सोय, पुण्यातून धावणार 211 बस
फक्त एसटी नाही, तर रेल्वे स्थानकांवरही गर्दीचा ताण वाढलेला आहे. ठाणे, दादर, पनवेल आदी ठिकाणी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी 24 तास आधीच रांगा लावल्या आहेत. मांडवी एक्सप्रेससारख्या गाड्यांना प्रचंड मागणी असून, त्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
advertisement
याशिवाय, काही राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनीही प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या आणि ट्रेन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सव आणि कोकण हे अविभाज्य नाते आहे. मुंबई-पुण्यात नोकरी करणारे कोकणवासी वर्षभर गावाकडे जाण्यासाठी उत्सुक असतात. परंतु गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी खास असतो. या काळात संपूर्ण कोकणात नातेवाईकांची गाठभेट, आरास, सजावट आणि उत्साहाचे वातावरण असते.
सरकारकडून मिळालेल्या या अतिरिक्त बस आणि रेल्वे सेवेमुळे यंदाचा गणेशोत्सव प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र गर्दीमुळे प्रवाशांनी सुरक्षिततेची काळजी घेणे आणि आगाऊ बुकिंग करणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.






