जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि आमदार राहुल कुल यांच्यासह टाटा कंपनीच्या प्रतिनिधींशी नुकतीच सविस्तर बैठक घेतली होती. या बैठकीत मुळशी धरणातून पाणी वळवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी विखे पाटील यांनी प्रस्तावाला हिरवा कंदील देत पाण्याच्या उपलब्धतेचा आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी तातडीने विशेष अभ्यास गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.
advertisement
सध्या मुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने टाटा हायड्रो पॉवर कंपनीच्या भौरा जलविद्युत प्रकल्पासाठी केला जातो. या प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा सुमारे 18.47 टीएमसी असून मृत साठा सुमारे 8.12 टीएमसी इतका आहे. दुसरीकडे पुणे शहराला सध्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने आणि लोकसंख्या वाढत असल्याने या धरणांवरील पाण्याचा ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पुणेकरांसाठी मुळशीचे पाणी
मुळशी धरणातून पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडले जाणारे आणि त्यानंतर समुद्राकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुणे शहरासाठी वापरण्याचा पर्याय पुढे आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि टाटा कंपनीमध्ये चर्चा होऊन या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
तज्ज्ञांचा अभ्यास गट नियुक्त
दरम्यान, जलसंपदा विभाग आणि टाटा कंपनीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक विशेष अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. हा गट मुळशी धरणातील पाणी नेमक्या कोणत्या कालावधीत, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या तांत्रिक पद्धतीने पुण्याकडे वळवता येईल याचा अभ्यास करीत आहे. बोगदा किंवा विशेष वाहिनीमार्फत पाणी आणण्याच्या पर्यायांचाही या अभ्यासात समावेश आहे.
पुढच्या आठवड्यात अहवाल
पुढील आठवड्यात या अभ्यास गटाचा प्राथमिक अहवाल सादर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रकल्पाला अधिकृत तांत्रिक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू होईल. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे.
पुणे शहराला अधिकचे पाणी
मुळशी धरणातून मिळणाऱ्या 7 टीएमसी अतिरिक्त पाण्यामुळे भविष्यात पुणे शहराचा पाणीपुरवठा अधिक स्थिर आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच खडकवासला धरण साखळीवरील अवलंबित्व कमी होऊन शहराच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनाला बळकटी मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.






