पुणे : महानगर पालिकेची किंवा शासकीय शाळा म्हटले की पालक दुर्लक्ष करतात, असे काही ठिकाणी दिसून येते. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्याच्या प्रत्येक कलागुणांना वाव मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून असतात. त्याबाबतचे चित्र आता बदलायला लागले आहे.
पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेतही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, हे वारंवार पुढे आले आहे. थेरगाव येथील महानगर पालिकेच्या माध्यमिक विद्यालयाने टाकाऊ वस्तूंपासून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. मागील 2 वर्षांपासून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
advertisement
शेतीसोबत पशुपालन, दिवसाला 4 हजारांची कमाई, साताऱ्यातील शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी!
बंदूक, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर इ. साधानांनी स्थिर वा हलत्या निशाणावर नेम धरून गोळी मारण्याचा खेळ म्हणजेच नेमबाजी आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत मोफत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर नेमबाजीत पारितोषिकेही पटकावली आहेत.
गरीब आणि होतकरू मुलांना रायफल शूटिंगची आवड जोपासणे जवळपास अशक्यच आहे. कारण, महिन्याला खासगी ठिकाणी रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास प्रतिमहिना 5 ते 10 हजार रुपये मोजावे लागतात. हेच लक्षात घेऊन शाळेतच पार्किंगच्या ठिकाणी प्रशस्त असे रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. प्रशिक्षक विजय रणझुंजारे यांनी विद्यार्थ्यांना रायफल प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे.
विद्यालयाने टाकाऊ वस्तूंपासून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. येथील प्रशिक्षण केंद्रात सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात 25 ते 30 मुले प्रशिक्षण घेत आहेत. शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गरजू मुलांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतला जातो, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक बी. राठोड यांनी दिली.
गरीब आणि होतकरू मुलांना मोफत प्रशिक्षण मिळत असल्याचा आनंद आहे, असे प्रशिक्षक विजय रणझुंजारे यांनी सांगितले. तर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण केंद्र उभारणारी थेरगाव येथील ही पहिलीच शाळा आहे.