किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या 9 वर्षीय मुलीवर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलीला तिच्या 69 वर्षीय आजीने किडनी दिली आणि जीवनदान दिलं. आजी आणि नातीच्या वयातील अंतर तसंच दोघांमधील गुंतागुंत अशा आव्हानांमुळे ही प्रक्रिया अवघड असली तरी ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
मुलीची दोन्ही मूत्रपिंडं आकुंचन पावली होती. सोबतच याचं निदानही उशिरा झालं, यामुळे तात्काळ प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं. शेवटी नातीचा जीव वाचविण्यासाठी आजीने आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
खराडीतील मणिपाल हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मनीषकुमार माळी यांनी याबद्दल बोलताना सांगितलं, की आजी आणि रुग्ण यांच्यातील वयाचे अंतर खूप जास्त होतं. मुलीचं वयही कमी होतं, तिचं वजनही १४ किलो असून उच्चरक्तदाबाचाही त्रास यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्मीळ आणि आव्हानात्मक होती. त्यामुळं हे प्रत्यारोपण आव्हानात्मक होतं. मात्र, आजी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्यानं त्यांची किडनी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. मनीषकुमार माळी यांच्यासह डॉ. आनंद धारस्कर, डॉ. अंकित शर्मा, डॉ. सुनील बोरडे यांनी ही शस्त्रक्रिया केली.
