सीईओ गजानन शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी राजकुमार बामने भोरच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये अचानक निरीक्षण करायला पोहोचले, तेव्हा शाळेमध्ये नियुक्त महिला शिक्षिका भारती मोरे कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर होत्या, पण शिक्षकांच्या हजेरी पटावर त्यांची सही होती. ही सही खोटी असल्याचंही अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता समोर आलं.
आरोपी महिला शिक्षिकेचं नाव भारती दीपक मोरे असं आहे. अनुपस्थित महिला शिक्षिकेच्या ऐवजी शाळेमध्ये दुसरी महिला शिकवत असल्याचं तपासात समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारती मोरेने नियुक्त केलेल्या महिलेला ठराविक पैसे द्यायची ऑफर दिली होती, याबदल्यात त्या महिलेला भारती मोरेऐवजी शाळेत जाऊन शिकवायचं होतं. याप्रकरणी शालेय अधिकाऱ्यांनी भारती मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, पण या नोटीसला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे भारती मोरे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
advertisement
कामावर अनधिकृतरित्या गैरहजर राहणे, कारण न देता मुख्यालय सोडणे, जबाबदारी प्रती निष्काळजीपणा दाखवणे, अनधिकृत व्यक्तीला स्वत:च्या कामाची जबाबदारी देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे तसंच शाळेच्या वर्गाची चावी अनधिकृत व्यक्तीला देणे, या आरोपांखाली महिला शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.
