पुण्यातील कसबा पेठेतील तांबट आळी ही शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मानली जाते. येथे पिढ्यानपिढ्या तांब्याची आणि पितळ्याची भांडी तसेच विविध वस्तू तयार करण्याचे काम केले जाते. पुणे शहराला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या आळीत तयार होणारी तांब्याची भांडी, कारागिरी आणि त्यामागील कौशल्य आजही लोकांचे लक्ष वेधून घेतात.
advertisement
तुम्ही कधी खाल्लंय का कवठ जाम? अलका यांनी उभारला व्यवसाय, महिन्याला 80000 कमाई
इतिहासातही तांबट आळीचे विशेष स्थान राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या परिसरात शस्त्रनिर्मितीचे काम होत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी विविध प्रकारची तांब्या-पितळ्याची भांडीही येथे तयार केली जात होती. आजही काही कुटुंबे ही परंपरा जपत आहेत.
मूळच्या मुंबईच्या असलेल्या स्नेहल खरवलीकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्यांच्या लग्नाला आता 26 वर्षे झाली असून त्यापैकी 24 वर्षे त्या तांबट व्यवसायात कार्यरत आहेत. सुरुवातीला त्या या कामात मदत म्हणून सहभागी झाल्या, परंतु हळूहळू त्यांनी या कामातील अनेक कौशल्ये आत्मसात केली.
कटिंग, नक्षीकाम, बेंडिंग, पॉलिशिंग तसेच अॅसिडद्वारे नक्षीकाम अशा विविध कामांमध्ये त्या प्रवीण झाल्या आहेत. या व्यवसायात महिलांचा सहभाग अत्यंत कमी असल्याचे त्या सांगतात. शंभर कामगारांमध्ये केवळ दहा टक्के महिला काम करत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन या क्षेत्रात येण्याची गरज असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
तांब्याचे दर वाढल्यामुळे या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. पूर्वी तांबट आळीत 25 ते 26 कारखाने कार्यरत होते, परंतु आता त्यांची संख्या केवळ 4 ते 5 इतकीच उरली आहे. त्यामुळे कामाच्या ऑर्डर्सही तुलनेने कमी झाल्या आहेत. तरीही आवड आणि चिकाटी असेल तर या व्यवसायातून खूप काही शिकता येते, असे स्नेहल खरवलीकर सांगतात. परंपरागत कलेचे जतन करत महिलांनीही या क्षेत्रात पुढे यावे, असा संदेश त्या आपल्या कामातून देतात.





