हत्तीवरून निघणारी राजाची मिरवणूक जालना शहरात 1889 पासून निघत आहे. प्रतीकात्मक राजा हत्तीवरून प्रजेला रेवड्या वाटतो. प्रजा देखील राजावर फुलांचा तसेच रंगांचा वर्षाव करते अशी ही परंपरा तब्बल 136 वर्षे जुनी आहे. जालना शहरातील नागरिकांनी ही परंपरा आजतागायत जिवंत ठेवली आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून हत्ती जातो त्या ठिकाणी रंग खेळणे बंद केले जाते.
advertisement
Video: माशाची शेव, माशाची चकली, माशाची... खायचं सोडा कधी पाहिलेही नसतील असे चटपटीत पदार्थ!
पूर्वी म्हणजेच सन 1889 पासून होळी उत्सव दांडी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच एक महिना चालायचा. त्यावेळेच्या जालन्यातील काही मित्रांनी एकत्र येऊन हत्ती रिसाला समितीची स्थापना केली होती. जास्त दिवस चालणारा सण म्हणून हा उत्सव परिचित असून, पूर्वी लोक शिवीगाळ करीत जास्त प्रमाणात पाणी आणि रंगाचा यासाठी वापर करीत होते. ही परंपरा कमी व्हावी आणि आगळी वेगळी परंपरा चालू व्हावी, या हेतूने विश्वासराव आवळे आणि मित्र कंपनीने सन 1889 मध्ये धुलीवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचे आयोजन केले होते.
त्यात राजा, प्रधान आणि भारतमातेचा देखावा करून ही मिरवणूक काढण्यात आली होती. ज्या मार्गाने ही मिरवणूक जाईल त्या मार्गावरील मिरवणुकीनंतर रंग खेळणे बंद होते. अशी परंपरा असून, ती आजतागायत सुरू आहे. शहरातील रंगार खिडकी, काद्राबाद येथून सराफा रोड, फुल बाजार, दाना बाजार, शोला चौक, बडी सडक, राम मंदिर, फुल बाजार, महावीर चौक, पाणीवेस कुंभार गल्लीमागे जाऊन पुन्हा रंगार खिडकी येथे मिरवणुकीचा समारोप होतो, असे हत्ती रिसाला समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक करतात सुरुवात
दरवर्षी, पोलिस अधीक्षक इथे जातीने हजर राहून मिरवणुकीची सुरुवात करतात. यंदा देखील पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हत्ती रिसाला मिरवणुकीचा प्रारंभ करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





