अयोध्या : अयोध्येत ऐतिहासिक, भव्य आणि दिव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले. जानेवारी महिन्यात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे. यानंतर आता जगातील सर्वात उंच असे राम मंदिर बांधले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातही जगातील सर्वांत उंच आणि भव्य असे श्रीराम मंदिर बांधले जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित राम मंदिराचे भूमीपूजन पुढच्या वर्षी 2025 मध्ये होणार आहे. या भव्य राम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
150 एकर जमिनीवर हे राम मंदिर बांधले जाणार आहे. हे मंदिर 5 मजली असेल आणि त्याची उंची 721 फूट असेल. गुजरातचे प्रसिद्ध वास्तुविशारद आशिष सोमपुरा हे ऑस्ट्रेलियातील या भव्य राम मंदिराची डिझाईन करणार आहेत. विशेष म्हणजे, आशिष सोमपुरा यांनीच अयोध्येच्या राम मंदिराची रचना तयार केली होती.
ऑस्ट्रेलियातील या प्रस्तावित राम मंदिरातील मार्गात 151 फुटाची हनुमानजीची मूर्तीही लावली जाईल. यासोबतच सप्तसागरात 51 फुटाची भगवान शंकराची मूर्तीही स्थापन केली जाईल. याशिवाय अयोध्यापुरी आणि सनातन विद्यापीठही बांधण्यात येणार आहे. हे मंदिर श्री राम मंदिर फाउंडेशनद्वारे बांधले जाणार आहे.
आवाजही येत नाही, उंचीवरही सहज चढते, भारतीय सैन्यदलात दाखल होणार स्पेशल वाहने
या मंदिरामुळे आस्ट्रेलियामधील भारतीयांना तसेच तेथील सर्व रहिवाशांनाही आपल्याच देशात रामललाचे दर्शन करता येणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि आजुबाजूच्या देशातील लोकांनाही याठिकाणी रामललाचे दर्शन, पूजन करता येईल.
पर्थमध्ये होईल भूमीपूजन -
ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील हे जगातील सर्वात उंच मंदिर असेल. या मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. मात्र, अजून त्यांच्याकडून परवानगी मिळाली नाही. काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाला भेट देऊ शकत नसतील तर पर्याय म्हणून या मंदिराचे भूमिपूजन अन्य मोठ्या नेत्याच्या हस्ते होईल, अशी माहिती श्री राम टेम्पल फाऊंडेशनचे सचिव अमोद प्रकाश कटियार यांनी दिली.