गाडगे बाबांचे अमरावतीशी नाते
संत गाडगेबाबांचे अमरावतीशी नाते केवळ जन्मापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या बहुतेक समाजसुधारणेच्या कार्याचा केंद्रबिंदू हाच परिसर होता. अमरावती शहर, धामणगाव, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर तसेच मेळघाट परिसरात त्यांनी सतत भ्रमंती करून समाजप्रबोधन केले. हातात झाडू घेऊन गावातील रस्ते, देवळांचे परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समाजाला पटवून दिले. अमरावती जिल्ह्यात त्या काळात असलेली अस्वच्छता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातिभेद यावर गाडगेबाबांनी तीव्र शब्दांत प्रहार केला. कीर्तन, भजन आणि भारुडांच्या माध्यमातून त्यांनी दारू पिणे, जुगार, हुंडा प्रथा आणि अस्पृश्यता याविरोधात जनजागृती केली. त्यांच्या कीर्तनासाठी अमरावती जिल्ह्यातील गावोगावी मोठी गर्दी होत असे.
advertisement
गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटले
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे मुख्य साधन असल्याचा ठाम विश्वास गाडगेबाबांचा होता. अमरावती जिल्ह्यातील गरीब, अनाथ आणि मागास विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या प्रेरणेतून अमरावती शहरात आणि जिल्ह्यात अनेक वसतिगृहे, धर्मशाळा आणि शाळा सुरू झाल्या. आज अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचे जिवंत प्रतीक मानले जाते.
69 वा पुण्यतिथी महोत्सव सुरू
20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबांनी देह सोडला. मात्र अमरावती जिल्ह्यात त्यांनी रुजवलेले स्वच्छता, समता, शिक्षण आणि मानवतेचे विचार आजही जिवंत आहेत. अमरावती शहरातील गाडगे नगर परिसरात संत गाडगे महाराजांचे भव्य समाधी स्थळ आहे. त्याठिकाणी महाराजांचे जीवनकार्य, त्यांचा कुटुंब परिचय भिंतीवर कोरला आहे. महाराजांच्या पत्नी कुंताबाई यांचा देखील पुतळा आहे. त्याठिकाणी दरवर्षी पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा संत गाडगे महाराजांचा 69 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
14 डिसेंबर पासून हा महोत्सव सुरू झाला आहे. त्यानिमित्त अमरावती शहरात भव्य यात्रा देखील आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच अमरावतीची विविध खाद्य संस्कृती देखील याठिकाणी बघायला मिळते. हा पुण्यतिथी महोत्सव 21 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.





