कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या मालकीचे दोन अश्व दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करत आषाढी वारीसाठी पुण्यात दाखल होतात. यंदाही अश्वांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यावर ते आळंदीच्या दिशेने रवाना झाले. या अनोख्या परंपरेला यंदाही साक्षीदार होण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
Sant Dnyaneshwar Palkhi 2025: माऊलींच्या पालखी रथासोबत काय काय असतं? तयारी आणि परंपरा
advertisement
अश्व मानवंदनेने उपक्रमांची सुरुवात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने मंदिरात अश्वांचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, वारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ट्रस्टकडून हरित वारी, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, रुग्णवाहिका सेवा, भोजन सेवा असे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची सुरुवात अश्व मानवंदनेच्या कार्यक्रमाने होते.
गणपती आणि माऊलींच्या भक्तीचा संगम
शितोळे सरकार म्हणाले की, “पूर्वी अश्व मंदिराबाहेरून दर्शन घेत असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना सभामंडपात प्रवेश दिला जातो, ही बाब अत्यंत शुभ मानली जाते.” गणपती आणि माऊलींच्या भक्तीचा हा संगम पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जे भक्त वारीत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे अश्व दर्शन एक भक्तिपूर्ण अनुभव ठरतो. वारीच्या आध्यात्मिक परंपरेला समर्पित असलेल्या या अश्वांची भेट ही गणेश भक्तांसाठी आणि वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बनली आहे.