कोल्हापूर : आपण सर्वजण गणेश जयंती साजरी करतो. मात्र माघ महिन्यातील गणेश जयंतीची महती खूप कमी जणांना ठाऊक आहे. मुळात या गणेश जयंती सोहळ्याचा खरा मानकरी हा महोत्कट ढुण्ढिराज विनायक आहे. या गणेशाच्या अवताराचीच जयंती माघ महिन्यात केली जाते. याबाबत कोल्हापूरचे मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲड प्रसन्न मालेकर यांनी सांगितले आहे.
advertisement
गणेश जयंती म्हटलं की, माघ चतुर्थी हा एकमेव दिवस आठवतो. वास्तविक शंकर, देवी, विष्णू, सूर्य यांच्याप्रमाणेच गणपतीही देखील एक संप्रदाय मुख्य देवता आहे. त्यामुळेच या इतर देवांप्रमाणेच गणेशाचेही अनेक अवतार आहेत. या प्रत्येक अवतार प्रकट झालेली तिथी ही त्यांची जयंती म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. याबाबत गाणपत्य संप्रदायांमध्ये पाहायला मिळतो, असे प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.
Maghi Ganesh Jayanti : सर्वांना पाठवा माघी गणेशोत्सवाचे हे शुभेच्छा संदेश, WhatsApp ला ठेवा Status
कधी कधी साजरी होते जयंती?
देवाच्या अनेक अवतारांपैकी पाच अवतारांच्या जयंती मुख्यत्वे करून संप्रदायात साजरा केल्या जातात. त्यापैकी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मायाकर असूराच्या संहारासाठी शेषाच्या ध्यानातून भगवान गणेश प्रगट झाले. त्यामुळे या तिथीला शेषात्मज गणेश किंवा मूषकग गणेश जयंती म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वतीच्या प्रार्थनेवरून मयुरेश्वर अवतार प्रगट झाला. या दिवशी आपण पार्थिव गणेश व्रत अर्थात गणेशोत्सव साजरा करतो. कार्तिक शुद्ध चतुर्थीला उमांगमलज म्हणजे उमा अर्थात पार्वतीच्या अंगावरील मळापासून गणपती प्रगट झाला. पुढे वैशाख पौर्णिमेला गणेशाने पुष्टीपती विनायक नावाने गणेशाने अवतार धारण केला. तर माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा पृथ्वीवरील अवतार अर्थात महोत्कट विनायकाचा अवतार प्रगट झाला.
काय आहे महोत्कट विनायक अवतार?
देवांतक आणि नरांतक नावाच्या दोन जुळ्या भावांनी नारद मुनींकडून शिवनामाचा उपदेश घेऊन त्रैलोक्य विजयाचे वरदान मागितले होते. शंकरांनी तसे वरदान दिल्यानंतर या दोघांनी उन्मत्त होऊन स्वर्ग पाताळ आणि पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले. त्यामुळे सर्वांनी भगवान गणेशांकडे गाऱ्हाणे घातले. तेव्हा बुद्धीदात्या गणेशाच्या प्रेरणेने माता आदीतीने तप प्रारंभ केले. माघ शुद्ध चतुर्थीला कश्यप ऋषींच्या घरी, कश्यप पत्नी माता आदितीच्या उदरी भगवान गणेश पुत्ररूपाने अवतीर्ण झाले. या अवताराचे चरित्र बहुतांशपणे श्रीकृष्णाच्या बालचरित्रासारखेच आहे. अनेक विविध राक्षस-राक्षसींचा संहार करून भगवान विनायक काशी नगरीच्या राजाच्या मुलांच्या विवाहासाठी काशी नगरीमध्ये गेले. तिथे असुरांनी माजवलेल्या प्रत्येक उत्पाताला उत्तर देऊन शेवटी त्यांनी देवांतक आणि नरांतक या असुरांचा संहार केला आणि धुंडीराज विनायक या नावाने काशीमध्ये प्रतिष्ठापित झाले.
विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यातील फरक माहितीये का? जाणून घ्या महत्त्व, Video
काशीसह कोल्हापुरात आजही होते पूजा
आजही काशीमध्ये ढुंण्डी विनायकाचे दर्शन त्याचबरोबर गणेशाच्या या लीलेमुळे अवतीर्ण झालेल्या 56 विनायक मूर्तींचे दर्शनही काशी यात्रेच्या दरम्यान घेतले जाते. पुढे करवीर क्षेत्राचा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर क्षेत्रात आले. तेव्हा त्यांच्या पाठोपाठ काशीची सर्व दैवते आणि तीर्थ देखील आली. गंगा आणि सर्व तीर्थ घाटी दरवाजा जवळ काशी कुंडामध्ये तीर्थरूपाने राहिले. तर या तीर्थकुंडाच्या पूर्वेला भगवान विश्वेश्वर काशीच्या काळभैरव अन्नपूर्णा दंडपाणी, ढुंण्ढी विनायक, नंदी अशा सर्व देवतांसह मूर्ती रुपात विराजमान झाले. आजही करवीर निवासिनीच्या आधी या सर्व देवतांचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे, असेही मालेकर यांनी सांगितले.
दरम्यान थोडक्यात कैलासामध्ये झालेला मयुरेश्वर अवतार, पाताळामध्ये झालेला शेषत्मज अवतार आणि याच हिशोबाने पृथ्वीवर झालेला हा महोत्कट अवतार म्हणून या महोत्कट रूपाचे पर्यायाने त्याच्या जयंती उत्सवाचे महत्त्व सर्व गणेश भक्तांसाठी अवर्णनीय आहे. या निमित्ताने अनेक गणेश मंदिरात गणेशाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)