निश्चित तारीख आणि तिथी
पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 2 मार्च रोजी संध्याकाळी 05:55 वाजता होईल आणि तिथीची समाप्ती 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 05:07 वाजता होईल. शास्त्रानुसार, होलिका दहन प्रदोष काळात केले जाते, म्हणून 3 मार्च रोजीच हा सण साजरा होईल. त्यानंतर 4 मार्चला धूलिवंदन खेळली जाईल.
होलिका दहन शुभ मुहूर्त
advertisement
होलिका दहन करण्यासाठी 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 06:22 ते रात्री 08:50 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ आहे. या 2 तास 28 मिनिटांच्या कालावधीत तुम्ही विधीवत पूजा आणि दहन करू शकता.
भद्रा काळ आणि त्याचा प्रभाव
यंदा 3 मार्च रोजी रात्री 01:25 ते पहाटे 04:30 या वेळेत भद्रा काळ असेल. भद्रा मुख आणि भद्रा पुच्छ काळ देखील याच दरम्यान आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे प्रदोष काळ भद्रा मुक्त असल्याने सायंकाळी दहन करण्यास कोणताही अडथळा नाही. भद्रा रात्री उशिरा सुरू होत असल्याने सायंकाळची पूजा फलदायी ठरेल.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण
योगायोगाने 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण देखील लागत आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसण्याची शक्यता कमी असल्याने त्याचा 'सूतक काळ' मानण्याची गरज नाही, असे अनेक ज्योतिषांचे मत आहे. तरीही, ग्रहणाच्या प्रभावामुळे या दिवशी केलेली पूजा आणि मंत्रजप अधिक प्रभावशाली ठरतील.
पूजेचे महत्त्व आणि राख
होलिका दहनाच्या वेळी गायीच्या शेणाचे गोळे, अक्षता, फुले आणि नवीन धान्य अर्पण करावे. दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहनाची राख घरी आणून अंगाला लावल्याने आणि घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते, अशी श्रद्धा आहे.
कोणाचे दर्शन टाळावे?
होलिका दहन हे आसुरी शक्तीच्या विनाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने पहिल्या वर्षी होलिका दहन एकत्र पाहू नये, तसेच गर्भवती महिलांनी दहनाच्या अग्नीपासून दूर राहावे. भद्रा काळ रात्री उशिरा असल्यामुळे सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर होलिका दहन करणे शास्त्रोक्त ठरेल. 3 मार्च रोजी होळी पेटवून आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करा आणि 4 मार्चला आनंदाने रंगांचा उत्सव साजरा करा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
