महिलांच्या सन्मानासाठी जिरोती उत्सव
मेळघाटमधील आदिवासी बांधव हा जिरोती उत्सव साजरा करतात. मेळघाट येथील रहिवासी असलेले उमेश आलोकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या सन्मानासाठी श्रावण महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. घरात गेरू आणि मातीचे रंग वापरून जिरोती मातेचे चित्र काढले जाते. यामध्ये महिलांचा जीवनप्रवास कसा असतो? महिलांना कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात? असा संपूर्ण देखावा त्या रंगवलेल्या चित्रांमध्ये दाखवला जातो. त्यानंतर या सर्व रंगकामाची पूजा केली जाते. त्याचबरोबर गेरू आणि मातीचा वापर करून अनेक देवी-देवतांची चित्रे काढली जातात.
advertisement
नैसर्गिक साहित्य वापरून झोका तयार करतात
श्रावण महिन्यात अनेक गावात वडाच्या झाडाला दोरी बांधून पाळणा तयार करतात आणि त्यावर झोके घेतात. तशीच परंपरा मेळघाटमधील कोरकु समुदायात देखील बघायला मिळते. श्रावण महिन्यातील जिरोती उत्सवात देखील महिला झोके घेतात. झोके घेण्यासाठी सागवानाचे लाकूड वापरून ते पाळणा तयार करतात. त्यात कुठलीही दोरी किंवा साखळी ते वापरत नाहीत. दोन खांबांना एकत्र बांधण्यासाठी झाडाच्या सालीचा वापर करतात. इतर कुठलेही साहित्य ते वापरत नाहीत.
Shravan Month : श्रावणात देवदर्शनाला जायचंय? जालन्यातून ST महामंडळाकडून विशेष गाड्या, संपूर्ण यादी
नैसर्गिक साहित्य वापरून अतिशय सुंदर आणि मजबूत असा झोका ते तयार करतात. त्याचबरोबर पुरुष मंडळी आदिवासी लोकपरंपरेतील नृत्य सादर करतात. सायंकाळच्या वेळी विविध पाना-फुलांनी गावात डोलार सजविला जातो. त्याची पूजा केली जाते. त्यानंतर लाकडाच्या या मोठ्या डोलाऱ्यावर एकाच वेळी आठ ते दहा महिला बसतात. त्यानंतर झोका घेत पारंपरिक गाणी गातात. जिरोती उत्सव म्हणून महिनाभर सायंकाळच्या वेळी महिला झोका घेतात. त्याचबरोबर गीत गाऊन आपला आनंद साजरा करतात.
पोळ्याच्या दिवशी डोलार विसर्जन
संपूर्ण श्रावण महिनाभर मेळघाटामधील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या अनेक गावात हा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी या डोलारचे विसर्जन होते. या डोलारसोबत बांबूच्या पावड्यांची देखील गावात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर गावालगत नदीकाठी त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर डोलार आणि पावडे नदीत विसर्जित करतात, असा हा जिरोती उत्सव संपन्न होतो.





