गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे, अनलासूर नावाचा एक राक्षस होता. तो देवांना आणि ऋषींना प्रचंड त्रास द्यायचा. सर्वजण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. अखेर सर्व देव आणि ऋषी गणपतीकडे गेले. त्यांनी गणपतीसमोर आपली व्यथा मांडली. त्यावेळी गणपती खूप लहान होते पण त्यांची कीर्ती मात्र मोठी होती. बाप्पाने थेट अनलासुराशी युद्ध केलं. तेव्हा अनलासुरानं गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला. मग मात्र, गणरायानं रुद्ररूप धारण करून अनलासुरावर मात केली. अनलासुराला जिवंत गिळलं.
advertisement
अनलासुराला गिळल्यानंतर बाप्पाच्या शरिराचा खूप दाह झाला. ऋषींनी अनेक उपचार केले पण, दाह काही शांत होत नव्हता. अखेर ऋषींनी बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या तेव्हा त्याचं शरीर थंड झालं. त्यानंतर बाप्पानं सर्व देवांना आणि ऋषींना आशीर्वाद दिला की, जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहिली जाते. गावखेड्यांमध्ये हरळ नावाचं गवत आढळतं. हे हरळ म्हणजेच दुर्वा असतात.