महाभारतातील ही ठिकाणे कोल्हापुरात
कोल्हापूर ही करवीर काशी आहे आणि याच करवीर नगरीचे महत्त्व श्रीकृष्णाने जाणले होते. खरंतर करवीर महात्म्य या संस्कृत ग्रंथात अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील चर्चेमधून या क्षेत्राचे महात्म्य सांगण्यात आले आहे. त्यातच पवित्र करवीर भूमीशी श्रीकृष्णाचे असलेले नाते पाहायला मिळते. कोल्हापुरात असणारी पन्हाळगड, विशाळगड, गोकुळ शिरगाव, वाशी, केखले आणि जाखले ही गावे आदी ठिकाणांचा उल्लेख या ग्रंथात आढळतो. ही ठिकाणे म्हणजेच श्रीकृष्णाशी संबंधित असणारी गोकुळ, मथुरा, द्वारका, वसुदेव ग्राम असल्याचे संदर्भ सापडतात, असे राणींगा यांनी सांगितले.
advertisement
'लालबागच्या राजा'चं कोल्हापूर कनेक्शन, 1980 पासून आहे खास परंपरा
पन्हाळा खाली दबला गेलाय कारण..
भगवान श्रीकृष्ण हे कालयवनाच्या वधासाठी द्वारके होऊन दक्षिणेकडे आले होते. तेव्हा ते या करवीर भूमीतील ब्रह्मगिरी पर्वतावर आले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या आघाताने तो पर्वत खाली दबला गेला. हा ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच आत्ताचा पन्हाळा होय. अशा या भौगोलिक घटनेचे देखील वर्णन या करवीर महात्म्य ग्रंथाच्या माध्यमातून पाहायला मिळते, असे राणींगा यांनी स्पष्ट केले आहे.
पंचगंगेत स्नान केल्यास नरकाची भीती नाही
कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्रात असणाऱ्या आठ महत्त्वाच्या नद्यांचे महात्म्य आणि त्यांचे खगोलशास्त्रीय वर्णन भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून झाले आहे. भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वर्गतरंगिणी, पयोवहा, पापहरा आणि पयोष्णी या आठ नांवांचा उच्चार करून पंचगंगेत स्नान केल्यास त्या नरास कधीही नरकाची भीती नाही. असा उल्लेख असलेल्या अगस्तीमुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील संवादाचे वर्णन देखील करवीर महात्म्य या ग्रंथात पाहायला मिळते, असे देखील उमाकांत राणींगा सांगतात.
कोल्हापुरात दाखवल्या बाललीला
श्रीकृष्णाच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग देखील करवीर महात्म्य या ग्रंथातून सांगण्यात आला आहे. श्रीकृष्णाबरोबर त्यांना जन्म देणारे देवकी आणि वासुदेव हे देखील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी माता देवकीने श्रीकृष्णाला त्याच्या बाललीला अनुभवण्याविषयीची इच्छा व्यक्त केली. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने करवीर क्षेत्रामध्ये गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका आदी क्षेत्रांची निर्मिती केली आणि या ठिकाणच्या आपल्या बाललीलांचे दर्शन आपल्या माता-पितांना करून दिले, असे उल्लेख आढळतात.
गणेशोत्सवात चांद्रयानची क्रेझ, मंडळानं पावतीवरच दिली खणखणीत सलामी!
अशी आहेत ही ठिकाणे
1) श्रीकृष्णाच्या करवीर भेटीतील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे कोल्हापुरातील गोकुळ श्रीगाव अर्थात गोकुळ शिरगाव. आपल्या मातापित्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या तृप्ततेसाठी श्री कृष्णाने याठिकाणी यमुना नदीचा प्रवाह आणला. याच यमुना नदीच्या तीरावर श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांचे दर्शन घडवून आणले होते. या ठिकाणचा डोह आजही अस्तित्वात आहे. उद्योगनगरी गोकुळ शिरगावच्या पश्चिम दिशेला कृष्णाचे मंदिरही आहे.
2) कोल्हापुरातील मध्यवस्तीत असणाऱ्या हुतात्मा पार्क परिसरात असणाऱ्या उद्यानात पूर्वीच्या जयंती आणि गोमती या महत्त्वाच्या नद्यांचा संगम आहे. याच संगमावर देखील संगमेश्वराचे एक मंदिर देखील आहे. हे ठिकाण म्हणजेच करवीर क्षेत्रातील द्वारका आहे.
3) कोल्हापुरातील कळंबापासून पुढे असलेल्या कात्यायनी देवी डोंगरावर असणारे ठिकाण म्हणजे श्रीकृष्णाशी संबंधित असणारे करवीर नगरीतील वृंदावन होय.
4) गिरगाव पर्वत म्हणजेच श्रीकृष्णाने आपल्या बोटांवर उचलून धरलेला गोवर्धन पर्वत आहे.
5) श्रीकृष्णाचे पिता असलेल्या वासुदेवांचे गाव अर्थात वसुदेव ग्राम म्हणजेच कोल्हापुरातील आत्ताचे वाशी हे गाव आहे.
6) ज्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला घडल्या, त्या नंद राजाची राजधानी असलेले नंदग्राम म्हणजेच आत्ताचे नंदवाळ आहे.
अशाप्रकारे श्रीकृष्णाच्या लीलेशी संबंधित असणारी अनेक स्थाने या करवीर नगरीत वसलेली कोल्हापुरात आजही पाहायला मिळतात. त्या त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मंदिरेही पाहायला मिळतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाशी देखील असा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे कोल्हापूर अर्थात करवीर भूमीचे पावित्र्य आणि महत्त्व अजूनच वाढलेले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)