या सणाशी जोडलेली एक वेगळी आणि कुतूहल निर्माण करणारी बाब म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा. सामान्यतः हिंदू धर्मात काळा रंग शुभ मानला जात नाही. विवाह, पूजाविधी किंवा इतर मंगलकार्यांमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र टाळले जाते. तरीही मकर संक्रांतीच्या दिवशी, विशेषतः काही भागांत काळे कपडे घालण्याची परंपरा आढळते. यामागे नेमके कारण काय, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
Makar Sankranti Special: मकर संक्रांत स्पेशल मसालेदार, चमचमीत भोगीची भाजी कशी बनवायची?
ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या राशीपरिवर्तनालाच संक्रांत म्हटले जाते. सौर दिनदर्शिकेनुसार हा काळ सोल्स्टिसशी संबंधित आहे. हिवाळ्यातील हा कालखंड दिवस लहान आणि रात्र मोठी असते. मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, म्हणूनच या दिवसाला उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. धार्मिक दृष्टीने उत्तरायणाला अत्यंत शुभ काळ मानले जाते आणि या मुहूर्तावर अनेक शुभ कार्यांना प्रारंभ केला जातो.
काळ्या रंगाच्या संदर्भात एक धार्मिक मान्यता अशी आहे की, हिवाळ्यातील दीर्घ रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते, याचे प्रतीक म्हणून काळ्या रंगाला निरोप दिला जातो. काही ठिकाणी असेही मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतो आणि त्यामुळे शरीरावर किंवा मनावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.
यासोबतच या परंपरेमागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारणही आहे. मकर संक्रांती हा हिवाळ्यातील अत्यंत थंड दिवसांच्या आसपासचा काळ असतो. काळा रंग इतर रंगांच्या तुलनेत अधिक उष्णता शोषून घेतो. त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. थंडीपासून संरक्षण मिळावे, आरोग्य टिकून राहावे, यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची ही प्रथा रूढ झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मकर संक्रांतीला खाण्यापिण्यालाही विशेष महत्त्व आहे. तीळ, गूळ, बाजरी, ज्वारी यांसारखे पदार्थ या काळात शरीराला उष्णता देतात. तीळ-गुळाचे लाडू, पोळ्या, खिचडी, पुरणपोळी अशा पदार्थांचा समावेश आहारात केला जातो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या म्हणीतून सामाजिक सलोखा आणि आपुलकी जपण्याचा संदेश दिला जातो.





