असे पडले त्र्यंबोली नाव
प्राचीन काळी कौंडिण्य ऋषिंनी आपली पत्नी सत्यवती हिला पतीसेवा सोडून गेल्यामुळे दासी होशील', असा शाप दिला. परंतु, ती अतिथीस भिक्षा घालण्यासाठी गेलेली होती. हे समजल्यावर द्विजवंशी जन्मून श्री महालक्ष्मीची दासी होऊन देवांना उपकृत करशील असा उःशापही दिला होता. पुढे भार्गव व विशालाक्षी ह्या ब्राह्मण दांपत्यास चतुर्भुज कन्या झाली. काही काळानंतर त्यांनी ही कन्या अंबाबाई देवीला अर्पण केली. करवीर नगरीतील मल्लालय तीर्थातील सुवर्णकमळे चोरून नेणाऱ्या दैत्यांचा वध करण्यासाठी देवीने ह्या कुमारीस नियुक्त केले. तेव्हा त्रिकाळ अंबू अर्थात पाण्यामध्ये बुडून तिने हे कार्य केल्यामुळे अंबाबाई देवीने तिच्यावर संतुष्ट होऊन त्र्यंबुली नामकरण केल्याची महती श्री पुजाकांनी दिली.
advertisement
आई अंबाबाई कुष्मांडा देवी रुपात, पाहा चौथ्या माळेची सालंकृत पूजा Video
त्र्यंबोली भेटीची कथा
देवांनी श्री महालक्ष्मीच्या सहाय्याने कामाक्ष दैत्याचा पराभव केला. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मदतीने त्याने कपटाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनही सरळ फिरविला असता त्याचे शेळी-मेंढीमध्ये रुपांतर होत असे व उलटा फिरवल्यास मूळ रूप प्राप्त होत असे. कामाक्षाने हा योगदंड सर्व देवांवरुन सरळ फिरविला. त्यामुळे त्यांचे शेळ्यामेंढ्यांमध्ये रुपांतर झाले व त्यांचा पराभव झाला. तेव्हा त्र्यंबुलीने चतुराई व चलाखीने हा योगदंड कामाक्षाकडून हस्तगत केला व त्याचा वध करुन सर्व देवांना पूर्ववत केले. विजयोत्सवामध्ये देव त्र्यंबुलीस आमंत्रण देण्याचे विसरुन गेले, तेव्हा ती रुसून पूर्वेकडील एका टेकडीवर जाऊन बसली. तेव्हा श्री महालक्ष्मीने ह्या चुकीचे निराकरण करण्यासाठी तिच्याकडे आपल्या सर्व लवाजम्यासह जाऊन तिची समजूत काढली व रागाचे शमन केले, अशी अख्यायिका अंबाबाई देवी आणि त्र्यंबोली भेटीबाबत सांगितली जाते.
द्वितीय माळेला अंबाबाईची महागौरी स्वरुपात पूजा; देवीच्या मनोहारी रूपाचा पाहा Video
कोहळा फोडण्याची परंपरा
कोल्हासूर दैत्याचा वध श्री महालक्ष्मीने केला होता. त्यासमयी मृत्यूपूर्वी त्याने माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी कूष्मांडभेद करण्यात यावा अशी प्रार्थना केली होती. देवांनी अंबाबाई देवीला तूच प्रतिवर्षी कुमारीरुप धारण करून कूष्मांड भेद कर आणि सर्व संकटे व अशुभ यांपासून जगताचे रक्षण कर अशी प्रार्थना केली होती. तर त्र्यंबुली देवीने क्रोधशमनानंतर अंबाबाई देवीला विनंती केली होती की प्रतिवर्षी मुक्तीमंडपात होणारा कुष्मांडभेद सोहळा माझ्या द्वारी व्हावा, तेव्हापासून प्रतिवर्षी शारदीय नवरात्रात पंचमीला श्री महालक्ष्मी गजारुढ होऊन श्री त्र्यंबुलीच्या भेटीस्तव लवाजम्यासह जाते आणि तिथे त्यासमयी कुमारीच्या हस्ते कूष्मांड भेद सोहळा संपन्न होतो. असेही श्रीपूजक किशोर मुनीश्र्वर यांनी स्पष्ट केले आहे. गजारुढ पूजा ही आनंद स. मुनीश्वर, किरण स. मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर या अंबाबाई मंदिरातील श्रीपूजाकांनी बांधली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)