कूष्मांडा देवीचे स्वरूप आणि महत्त्व
दुर्गेच्या चौथ्या स्वरूपाला कूष्मांडा देवी म्हणतात. अष्टभुजा असलेल्या या देवीच्या हातात बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आहे. सिंह हे तिचे वाहन आहे.
स्मितहास्याने ब्रह्मांड निर्माण केल्यामुळे या देवीला कूष्मांडा असे नाव मिळाले. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर होते. देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात असून तेथे वास करण्याची शक्ती केवळ तिच्यात आहे, असे मानले जाते.
advertisement
कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे आजार दूर होतात, आरोग्य, शक्ती, यश आणि आयुष्य वाढते. तसेच मनुष्याला सुख, समृद्धी आणि शांतीची प्राप्ती होते.
पूजनविधी आणि नैवेद्य
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर कूष्मांडा देवीच्या पूजनाचा संकल्प करावा. पूजनावेळी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. देवीला लाल फुले, विशेषतः जास्वंद किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. धूप, दीप दाखवून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य द्यावा. दही आणि साखर-फुटाण्याचा नैवेद्य विशेष शुभ मानला जातो. चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीच्या भक्तिभावाने पूजनाने आयुष्य, आरोग्य, शक्ती आणि समृद्धी प्राप्त होते, असे शास्त्रात सांगितले आहे.