सर्वसाधारणपणे नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित 9 दिवसांचा काळ असतो. नवव्या दिवशी देवीची विशेष पूजा होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. मात्र यंदा पंचांगानुसार तृतीया तिथी दोन दिवस राहिल्याने नवरात्र 10 दिवसांची झाली आहे. त्यामुळे देवीची उपासना, उपवास सोडणे आणि घट विसर्जन नेमकं कधी करावं, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
advertisement
या संदर्भात आदित्य जोशी गुरुजी सांगतात की, “नवरात्रात अष्टमी किंवा नवमीला कुमारी पूजन व उपवास पारण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदा जरी नवरात्र 10 दिवसांची असली, तरी देवीची उपासना पहिल्या 9 दिवसांपुरती ठेवावी आणि नवमीला (1 ऑक्टोबर) उपवास पारण करावे, हे शास्त्रसम्मत आहे.”
दरम्यान, घट विसर्जन हा विधी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी करावा, असेही गुरुजी स्पष्ट करतात. त्या दिवशी देवीला निरोप देत तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते. यंदाच्या वाढीव नवरात्रामुळे भाविकांमध्ये गोंधळ असला तरी, नवमी दिवशी (1 ऑक्टोबर) उपवास पारण व विजयादशमीला (2 ऑक्टोबर) घट विसर्जन करणे हे शास्त्रानुसार योग्य असल्याचे गुरुजी सांगतात.
तथापि स्थानिक परंपरा, घरगुती कुलाचार आणि मंदिरांची दिनदर्शिका लक्षात घेता काही ठिकाणी 10 दिवस उपवास केला जातो. त्यामुळे काही भक्त विजयादशमीच्याच दिवशी उपवास पारण करतात.