पुणे : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची सध्या देशभर सुरू आहे. लोकार्पणचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येत 22 जानेवारीला होणार्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. पाचंगे यांना मिळालेल्या या निमंत्रणाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सोहळ्यात पाचंगे 45 देशातील विशेष निमंत्रितांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर चौघडा वादन करणार आहेत.
advertisement
40 वर्षांपासून पुढे नेत आहेत कला
सनई चौघडा हा मंगलकार्याचे प्रतीक. आजच्या डिजिटल युगात या वाद्याचा निनाद मोबाईल किंवा सीडीमध्ये जरी बंदिस्त झाला असला तरी आजही सनई चौघडा, ताशा, संबळ सारख्या मंगल वाद्यांचा सांस्कृतिक ठेवा पाचंगे कुटुंबाने जपला आहे. त्यामध्ये एक नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल ते म्हणजे चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांचे. पांचंगे कुटुंबात जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली आणि आता त्यांचे नातू रमेश पाचंगे ही कला गेल्या 40 वर्षांपासून पुढे नेत आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच का? पुण्यातील 'त्या' ज्योतिषाने ठरवला शुभ मुहूर्त
जानेवारी 2021 मध्ये यापूर्वी झालेल्या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनामध्ये सनई चौघडा सादरीकरणाचा मान त्यांना मिळाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी हातात घेतलेल्या या वाद्याचे आजही तितक्याच साधनेने आणि तन्मयतेने ते वादन करताना दिसतात. ही कला पुढच्या पिढीमध्ये देखील जिवंत राहावी यासाठी शाळांमधील मुलांना या कलेचे शिक्षण देण्याबाबत त्यांनी आश्वासक पावले उचलली आहेत. आपल्या कलेवरील प्रभुत्वामुळे शहर आणि राज्यभरातील जवळपास 587 पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. आता त्यांच्या कलेचा आस्वाद घरबसल्या घेण्याची संधी देशविदेशातील संगीत प्रेमींना मिळणार आहे.
पुण्यातील पथक करणार अयोध्येत शंखनाद; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण PHOTOS
विश्व मराठी ऑनलाइन संमेलनामध्ये 25 देश सहभागी झाले होते. त्यांच्यापर्यंत सनई चौघड्याचा निनाद पाचंगे यांनी पोहोचवला होता. त्यानंतर देहुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पाचंगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर चौघडा वादन केले होते. शहरासह राज्यात झालेल्या अनेक मोठ्या सोहळ्यांमध्ये पाचंगे यांचे चौघडा वादन श्रवणीय ठरले आहे. त्यानंतर आता जगाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता बोलावणे म्हणजे, एकप्रकारे कलेला मिळालेला सन्मान असल्याची भावना चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांनी बोलताना व्यक्त केली.