राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच का? पुण्यातील 'त्या' ज्योतिषाने ठरवला शुभ मुहूर्त
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत असून हा मुहूर्त पुण्यातील ज्योतिषाने ठरवला आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. सोमवारी मृगाशिरा नक्षत्रातील मुहूर्त खास असल्याचे सांगितले जात आहे. पण अनेकांना माहिती नसेल की हा शुभमुहूर्त पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी काढला आहे. राम मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी 22 जानेवारी हीच तारीख का निवडली? या दिवशी काय खास आहे? याबाबत काय खास आहे, हे आपण पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला का ?
राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी या तारखेला का? याविषयी बोलताना पंचांगकर्ते गौरव देशपांडे सांगतात की, एप्रिल 2023 मध्ये राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी त्यांना आश्रमात बोलवलं होतं. राम मंदिर प्रतिष्ठापनेचा अतिशय शुद्ध असा मुहूर्त आम्हाला हवा आहे, असं त्यांनी बजावलं. 25 जानेवारीच्या आतला आणि उत्तरायणा मधला मुहूर्त हवा होता, अशी भूमिका गोविंद गिरी महाराज यांनी मांडली होती. त्यानुसार 22 जानेवारीचा शुभमुहूर्त निश्चित केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
advertisement
प्राण प्रतिष्ठेसाठी पौष महिना उत्तम
राम प्रभूंची प्रतिष्ठापना होताना पौष महिना आहे. पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे समज गैरसमज लोकांमध्ये असतात. पौष महिन्यात शुभ कामं करू नयेत, असं म्हटलं जातं. त्या दृष्टीनं प्राचीन ग्रंथ हस्तलिखित फॉरमॅटमध्ये आहे, त्यांची छाननी सुरू झाली. त्यामध्ये बृहद् दैवत नरंजन विद्या माधवीय मुहूर्त गणपती इत्यादी ग्रंथांचं परिशिलन केल्यानंतर, प्राण प्रतिष्ठेसाठी पौष महिना हा अतिशय उत्तम सांगितला आहे. त्याचं फळ देताना आचार्य असं सांगतात की पौष महिन्यात प्राण प्रतिष्ठा केली तर राज्याची वृद्धी होते, लोकांना लाभ होतो. जनता सुखी होते, असं फलित दिलं, तेवढं पाहून पौष महिना फिक्स करण्यात आला, असं देशपांडी यांनी सांगितले.
advertisement
प्राण प्रतिष्ठापनेसाठी मृग नक्षत्र अतिशय उत्तम
पुढे देशपांडे सांगतात की, मृग नक्षत्र हे अतिशय उत्तम आहे. प्राण प्रतिष्ठापनेसाठी त्यामुळं द्वादशी सोमवार मृग नक्षत्र या सर्वांचा मिळून दिवस आला तो 22 जानेवारी 2024. यातील वेळ सुद्धा महत्त्वाची होती. प्राण प्रतिष्ठापना होणार अयोध्याला, त्यामुळे आयोध्यातील रेखांश आणि अक्षांश याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मेष लग्नाचा सव्वा दोन तासाचा वेळ काढून देण्यात आलेला आहे. मूर्तीची स्थिर प्रतिष्ठापणा होणार असून पुढं हजारो वर्ष राहणार आहे. त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा स्थिर मुहूर्त काढून दिला आहे.
advertisement
कोण आहेत गौरव देशपांडे?
पुण्यातील गौरव देशपांडे यांनी राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त काढला असून ते पुण्यातील प्रसिद्ध पंचांगकर्ते आहेत. देशपांडे हे व्यवसायानं आयटी अभियंता आहेत. परंतु ते इतर वेळी याचा अभ्यास करतात. त्यांचं देशपांडे पंचांग हे प्रकाशन सुद्धा दरवर्षी होत असतं आणि गेले कित्येक वर्ष ते या सगळ्या वेद शास्त्रीय अभ्यासात कार्यरत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 30, 2023 6:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच का? पुण्यातील 'त्या' ज्योतिषाने ठरवला शुभ मुहूर्त