अयोध्या : 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण या दिवशी संपूर्ण जगाला ना भूतो ना भविष्यति असा भव्य सोहळा भारतात पाहायला मिळाला. भाविकांनी वर्षानुवर्षे ज्याची आतुरतेनं वाट पाहिली ते स्वप्न याच दिवशी साकार झालं. साक्षात प्रभू श्रीराम अयोध्येच्या ऐतिहासिक मंदिरात विराजमान झाले. या दिवसानंतर अयोध्या शहराचं नाव जगभरात दुमदुमलं. आज इथं दररोज लाखो भाविक, पर्यटक हजर होतात.
advertisement
राम मंदिरात श्रीरामांच्या मंदिरासह 18 मंदिर स्थापन केले जाणार आहेत. राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. दुसऱ्या मजल्याचं काम वेगानं सुरू आहे. इथंच श्रीरामांच्या दरबाराची स्थापना होईल. या दरबारातील मूर्ती पांढऱ्या संगमरमर दगडांमध्ये कोरल्या जात आहेत. अद्वितीय शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या राजस्थानच्या जयपूर शहरात हे काम सुरू आहे. दरबारात श्रीरामांसह सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत आणि शत्रुघ्न इत्यादी देवतांचं दर्शन होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2025 रोजी राम मंदिरात पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. यावेळी श्रीराम दरबाराची स्थापना केली जाईल. काही दिवसांपूर्वी बांधकाम समितीची बैठक झाली. त्यावेळी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. श्रीरामांचा दरबार आणि त्यातील मूर्ती हा यावेळी प्रमुख विषय होता.
समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्र यांनी सांगितलं की, राम मंदिरात आणखी मंदिरांचं बांधकाम सुरू आहे. तसंच श्रीरामांच्या दरबाराचं काम वेगानं होतंय. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर राम मंदिर ट्रस्टकडून विचारविनिमय करून दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत निर्णय घेतला जाईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ही प्राणप्रतिष्ठा करण्याचा विचार आहे. दरम्यान, 22 जानेवारी 2025 रोजीच हा सोहळा पार पडेल, अशी चर्चा आहे.