अयोध्या : 22 जानेवारी 2024 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच दिवशी संपूर्ण जगाने अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहिला. भव्य मंदिरात श्रीरामांच्या अत्यंत आखीव-रेखीव सुंदर अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली. आज दररोज लाखो भाविक श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होतात. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पहिल्यांदा साजरी होणारी रामनवमी खास असणार यात काहीच शंका नाही.
advertisement
कोट्यवधी रामभक्त जवळपास 500 वर्षांपासून राम मंदिराच्या प्रतीक्षेत होते. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी देश-विदेशातील भाविक अयोध्येत दाखल झाले होते. तो नेत्रदीपक सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. आता येत्या 17 एप्रिल रोजी आणखी एक अद्भुत असा क्षण पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : Astrology: खूप सोसलं! आता अगदी मनासारखं होईल, 5 राशींसाठी गुड न्यूज – News18 मराठी (news18marathi.com)
17 एप्रिलला सर्वत्र रामनवमी साजरी होईल. याच दिवशी दुपारी 12:00 वाजता अयोध्येच्या राम मंदिरातील श्रीरामांच्या माथ्यावर सूर्यकिरणं पडतील. उत्तराखंडमधील आयआयटी रुडकीच्या शास्त्रज्ञांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. आरश्याच्या माध्यमातून सूर्यकिरणं श्रीरामांच्या माथ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाला असून आता तो रामनवमीला सर्वांना पाहता येईल.
नेमकं घडणार काय?
रामनवमीच्या दिवशी राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका आरश्यावर सूर्याची किरणं पडतील. ती परावर्तित होऊन एका पितळेच्या पाईपमध्ये जातील. या पाईपमध्ये असलेल्या एका आरश्यावर किरणं परावर्तित होऊन 90 डिग्रीवर पुनर्परावर्तित होतील. त्यानंतर पितळेच्या पाईपमधून किरणं 3 वेगवेगळ्या लेंसमधून जातील. मग पाईपच्या टोकाला मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या एका आरश्यावर किरणं पडून थेट श्रीरामांच्या मुखावर दिसतील. त्यांच्या माथ्यावर या किरणांचा एक लहान गोल तयार होईल. रामनवमीला दुपारी 12 वाजता श्रीरामांच्या माथ्यावर हा सूर्यकिरणांचा टिळा पाहता येईल. श्री राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.
दरम्यान, पौराणिक कथांनुसार, त्रेता युगात जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, तेव्हा सूर्यदेव महिनाभर अयोध्येत थांबले होते. हेच दृश्य आता कलियुगातही साकारण्यात येणार आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा