स्वप्नात साधी मांजर दिसणे - स्वप्नात एखादी मांजर शांतपणे बसलेली किंवा नुसती फिरताना दिसली, तर त्याचा संबंध तुमच्या मनात चाललेल्या विचारांशी असतो. याचा अर्थ असा असू शकतो की सध्या तुम्ही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. मनात शंका, संभ्रम किंवा सावधपणा आहे. तुमचं मनच तुम्हाला थोडं जपून राहायला सांगत असतं.
advertisement
काळी मांजर दिसणे - स्वप्नात काळी मांजर दिसणं हे अनेकदा मनातील भीती किंवा गोंधळ दर्शवतं. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात शंका आहे, पण ती नेमकी काय आहे हेच तुम्हाला समजत नाहीये. एखादी अनोळखी परिस्थिती, नवीन बदल किंवा भविष्याबद्दलची चिंता यामुळे असं स्वप्न पडू शकतं.
पांढरी मांजर दिसणे - पांढरी मांजर दिसायला शांत आणि स्वच्छ वाटते, पण स्वप्न यामधून वेगळाच इशारा देत असू शकतं. बाहेरून जी गोष्ट किंवा व्यक्ती चांगली वाटते, ती आतून तितकी प्रामाणिक नसेल, असं हे स्वप्न सांगत असतं. एखाद्यावर अंधविश्वास ठेवण्याआधी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, असा संकेत यातून मिळतो.
मांजरीने हल्ला करणे - स्वप्नात मांजरीने तुमच्यावर हल्ला केला, ओरबाडलं किंवा घाबरवलं, तर हे स्वप्न वास्तविक आयुष्यातील ताणतणावाशी जोडलेलं असतं. कुणीतरी तुमच्यावर मानसिक दबाव टाकत असण्याची शक्यता असते. मनात राग, चिडचिड किंवा अस्वस्थता साचलेली असते. हे स्वप्न स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा आणि ठाम भूमिका घेण्याचा इशारा देतं.
मांजरीचे प्रेमाने जवळ येणे - मांजर प्रेमाने तुमच्या जवळ येऊन बसली, अंगावर घासली किंवा तुम्ही तिला कुरवाळताना दिसत असाल, तर हा चांगला संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःच्या भावना समजून घेऊ लागला आहात. मनातला एकाकीपणा कमी होऊ शकतो. आयुष्यात एखादी विश्वासू व्यक्ती येण्याची किंवा नात्यांमध्ये जवळीक वाढण्याची शक्यता असते.
गुरुवारी जया एकादशी! जाणीवपूर्वक टाळाव्या अशा गोष्टी; केलेले व्रत-उपवास निष्फळ
मांजर पळून जाणे - स्वप्नात मांजर पळून जाताना दिसणं म्हणजे एखादी संधी हातातून निसटणं किंवा कुणावरचा विश्वास तुटणं. एखादं नातं कमजोर होत असल्याची किंवा एखादी परिस्थिती तुम्ही नीट हाताळू शकत नाहीये, अशी भावना यातून व्यक्त होते.
स्वप्नाचा खरा अर्थ कसा ओळखायचा - स्वप्नं फक्त इशारा देतात, निर्णय मात्र तुम्हालाच घ्यायचा असतो. स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, भीती वाटली की समाधान मिळालं, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या भावना हाच स्वप्नाचा खरा अर्थ समजून घेण्याचा मुख्य आधार असतो. स्वप्न म्हणजे मनाचा तो आवाज असतो, जो दिवसा गोंगाटात दडून जातो आणि रात्री शांततेत तुमच्याशी बोलायला लागतो.
पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
