या भव्य पुष्पसजावटीसाठी तब्बल 50 लाख मोगऱ्याच्या फुलांसह गुलाब, झेंडू, लिली, जास्वंद, चाफा, शेवंती आणि अनेक रंगीबेरंगी फुलांचा मोहक वापर करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.
advertisement
या देखाव्याची तयारी मागील दोन दिवसांपासून सुरू होती. तब्बल 140 महिला आणि 80 पुरुष कारागिरांच्या मेहनतीने संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले. या सजावटीसाठी 3000 गुलाब बंडल, 1500 लिली बंडल, 1400 किलो झेंडू, 1500 किलो शेवंती, 1000 किलो गुलछडी, 20 हजार चाफा, 100 किलो गुलाब पाकळ्या तसेच जाई-जुई, कमळ, जास्वंद यासह अनेक फुलांचा समावेश होता, असं ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले .
चैत्र महिन्यात चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाला चंदन लेप आणि उन्हाळा असल्यामुळे गारवा राहावा यासाठी मोगरा, चाफा अशी विविध प्रकारची फुल मंदिरात सजावट केली जाते. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला वासंतिक उटीचे लेपन करण्यात आले होते. यासोबत अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे भक्तिमय भजनसेवा सादर करण्यात आली. मंदीरात फुलांचा सुवास दरवळत होता, तर रंगीबेरंगी सजावटीने संपूर्ण परिसर सजलेला पाहिला मिळत होता हेच गणरायचं सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.