त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेपासून ते 27 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान, भाविकांची त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हिआयपी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 26 फेब्रुवारी रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीला घरीच बनवा उपवासाचं चाट, तुम्हाला नक्कीच आवडेल, रेसिपीचा संपूर्ण Video
महाशिवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
महाशिवरात्र उत्सव 2025 च्या अनुषंगाने मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या सोहळ्यानुसार यावर्षी देखील 24 फेब्रुवारी रोजी मेहंदी तसेच 25 रोजी हळदीचा समारंभ साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने समारंभास अनुसरून फुलांची विशिष्ट सजावट करण्यात येणार आहे. तसेच 25 रोजी सायंकाळी 7 ते सायंकाळी 9 या वेळेत बासरी प्रशिक्षण वर्ग, नाशिक यांचा ‘भक्तिमय बासरी वादन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर परंपरेनुसार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पूजा करुन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे.
पालखी दरम्यान शिव-तांडव ग्रुप तर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 8 वाजता नटरंग अकॅडेमी, पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार यांचे मार्फत करण्यात येणार आहे. तसेच देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.26) रोजी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.
महाशिवरात्री निमित्त ट्रस्टची जय्यत तयारी
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.