स्वयंभू मूर्ती आणि आख्यायिका
मंदिरातील तुळजाभवानीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. आख्यायिकेनुसार, मोरया गोसावी यांच्यापूर्वी एका भाविकाची देवीकडे प्रचंड श्रद्धा होती. तो भाविक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असे. एकदा दर्शनानंतर परत येताना देवी त्याच्यासोबत आली, परंतु तुळजाभवानीने त्याला मागे वळून पाहू नको, असे सांगितले होते. भाविक आकुर्डीला पोहोचल्यावर मागे वळून पाहिला आणि देवी त्या ठिकाणी गुप्त झाली. त्यानंतर श्री मोरया गोसावी यांनी मंदिरात मूर्तीची स्थापना केली, अशी माहिती मंदिराची विश्वस्त तारचंद्र काळभोर यांनी दिली. भाविकांची श्रद्धा आहे की या ठिकाणी बोललेला नवस पूर्ण होतो. नवरात्रीत येथे दररोज सुमारे 20,000 भाविक दर्शनासाठी येतात.
advertisement
तुळजाभवानी मंदिर हे केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर स्थापत्यकलेच्या दृष्ट्या देखील ऐतिहासिक ठिकाण आहे. हेमाडपंती शैलीतील वास्तुकला, प्राचीन शिल्पकला आणि मंदिरातील मूर्तींमधील नाजूक शिल्पकौशल्य भाविकांना आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करते.
नवरात्रीच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नवसाला पावणारं मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असल्यामुळे या मंदिरात वर्षभर गर्दी पाहायला मिळते.