कोल्हापूर : सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती असते. नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेला आणि मराठी वर्षाच्या माघ महिन्याच्या माघ चतुर्थी तिथीला गणेश जयंती आली आहे. विशेष म्हणजे वर्षातून तीन वेळा आपल्या लाडक्या बाप्पाला विशेष पूजले जाते. गणेश चतुर्थी याचे महत्त्व आणि त्यासोबतच आख्यायिकांबद्दल आपण ज्योतिष शास्त्री राहुल कदम यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
advertisement
पुष्टिपती गणेशोत्सवाचे काय आहे महत्त्व?
गणरायाने भक्तांच्या कल्याणासाठी आणि राक्षसांचा पराभव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यापैकी पुष्टिपती विनायक हा एक अवतार असून, याचा उल्लेख मुद्गल पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार, प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांत उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले.
दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषी नारदमुनींनी शिव-पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले.
फेब्रुवारीत होणार 2 मोठ्या ग्रहांची युती, 3 राशींसाठी ठरू शकते नुकसानाची, काळजी घ्या!
नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात शिव-पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले. एका बाजूला हे घडत असताना, दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले. पुष्टिपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले, असं राहुल कदम यांनी सांगतील.
पुष्टी पती विनायकाच्या नंतर सगळीकडे अतिशय उत्साहात जी गणेश जयंती किंवा चतुर्थी साजरी केली जाते ती म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजन केले जाते. म्हणजेच मातीच्या गणपतीचे पूजन केले जाते. या मागची जर कथा पाहिली तर भगवान शंकरांच्या आधी सर्व गण होते. मात्र माता पार्वतीकडे स्वतःचा एकही गण नव्हता. त्यामुळे एक दिवस माता पार्वती स्नानासाठी जात असताना द्वाररक्षक म्हणून तिला कोणीतरी हवे होते. त्यासाठी माता पार्वतीने आपल्या शरीराला लावलेल्या उटण्यामधून एका बालकाची निर्मिती केली व त्या बालकामध्ये प्राण फुंकून द्वार रक्षक म्हणून त्याची नेमणूक केली.
भगवान शंकरांसोबत त्या द्वाररक्षकाचे युद्ध झाल्यानंतर त्यांनी त्या बालकाचे मस्तक उडवले व माता पार्वतीच्या आग्रहाखातर त्याला हत्तीचे मस्तक लावले. तोच बालक हा शंकर पार्वतीचा पुत्र गणेश म्हणून ओळखला जातो. त्याचेच पूजन आपण पार्थिव गणेश पूजन म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करतो. वर्षातली तिसरी गणेश जयंती येते ती माघ शुद्ध चतुर्थीला. येथे ही माघी गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. या गणेश जयंतीची कथा पाहिली तर पुराण काळात नारांतक नावाच्या राक्षसाची निर्दालन करण्यासाठी गणेशाने कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतला होता. तो जन्म ज्या दिवशी घेतला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता, असंही राहुल कदम यांनी सांगतील.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.