मूर्ती झाकून आणण्यामागचं कारण काय?
गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना ती नेहमी झाकलेलीच असते. यामागचं कारण सांगताना शंकर पाटील म्हणाले, गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना अजून तिची प्राणप्रतिष्ठा झालेली नसते. त्या वेळी ती फक्त माती, शाडू किंवा प्लास्टरची मूर्ती असते. रस्त्यावर कोणी पाहू नये, धूळ वारा लागू नये किंवा कुणाची वाईट नजर पडू नये, यासाठी मूर्ती झाकून आणण्याची प्रथा आहे.
advertisement
बाप्पाची मूर्ती आणताना या गोष्टी कटाक्षाने पाळा
गणपती बाप्पाची मूर्ती आणताना वास्तुशास्त्राच्या नियमानुसार काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. घरासाठी नेहमी मध्यम आकाराची मूर्तीच योग्य मानली जाते. ती ना खूप मोठी असावी, ना खूप लहान. मध्यम आकाराची मूर्ती घरासाठी शुभ मानली जाते, तर मोठ्या आकाराच्या मूर्ती सार्वजनिक मंडळात ठेवण्यासाठी योग्य मानली जाते.
गणपतीची मूर्ती कधी आणावी?
गणपती बाप्पाची मूर्तीही दिलेल्या शुभ मुहूर्तावरच आणावी. असं केल्याने शुभ फल प्राप्त होतं. यावर्षी घरगुती मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठीचा मुहूर्त सकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत आहे. तर दुपारी दीडनंतर सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे शंकर पाटील यांनी सांगितले.





