कानपूर: आगामी आशिया कपमध्ये उद्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून सध्या देशात वादंग सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होत असल्यामुळे भाजप आणि बीसीसीआयवर (BCCI) विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. अनेक क्रिकेटपटूंनीही या सामन्याला विरोध दर्शवला आहे. आता या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले जवान शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनीही या सामन्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
advertisement
ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या, पाकिस्तान या सामन्यातून मिळणाऱ्या कमाईचा उपयोग दहशतवाद्यांवर खर्च करेल, जे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. मग आपण पाकिस्तानला ही संधी का देत आहोत?
बीसीसीआय 26 कुटुंबांना विसरले...
आशिया कप 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या, बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटते की, बीसीसीआयला त्या 26 कुटुंबांप्रती कोणतीही भावना नाही. त्यांनी पहलगाम हल्ल्यात आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या जीवितहानीला विसरून गेले आहेत. मी आमच्या क्रिकेटपटूंनाही विचारू इच्छिते की ते असे का करत आहेत? ते पाकिस्तानच्या संघासोबत खेळायला का तयार झाले आहेत?
क्रिकेटर विरोध का करत नाहीत?
क्रिकेटपटू देशभक्त असतात असे म्हटले जाते. याच देशप्रेमामुळे राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट पाहणे आणि खेळणे पसंत करतात. पण एक-दोन क्रिकेटपटू वगळता, कोणीही पुढे येऊन असे म्हटले नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. बीसीसीआय त्यांना बंदूक दाखवून खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी आपल्या देशासाठी उभे राहायला पाहिजे. पण ते असे करत नाहीत. मी या सामन्याच्या प्रायोजक आणि प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्या 26 कुटुंबांप्रती त्यांची काहीही जबाबदारी नाही का?, असे ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या.
पाकिस्तान कमाईचा काय उपयोग करणार?
पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेवर ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या, या सामन्यातून पाकिस्तानला मिळणाऱ्या कमाईचा उपयोग कशासाठी होईल? यात कोणतीही शंका नाही की, पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल. तो एक दहशतवादी देश आहे. आपण त्यांना पैसे पुरवू आणि ते त्याचा उपयोग पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी करतील. मला हे समजले आहे, पण लोकांना हे समजत नाहीये. म्हणून मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करते. तुम्ही हा सामना पाहण्यासाठी जाऊ नका आणि यासाठी आपला टीव्हीही चालू करू नका.
ऐशान्या द्विवेदी यांनी सांगितले की- पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटले होते की, आपण पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. आपण त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आपण त्यांच्या भूमीवर सामना खेळण्यासाठी जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंनाही आपल्या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण बीसीसीआयने याचाही मार्ग काढला. आशिया कप 2025 मधील हा सामना दुबईमध्ये ठेवण्यात आला आहे. तसेच असेही म्हटले जात आहे की, भारत थेट पाकिस्तानसोबत खेळत नाहीये, तर भारत आशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयलाही पाकिस्तानविरुद्ध हा सामना न खेळण्याचे आवाहन केले होते. पण मला वाटते की, माझी विनंती बीसीसीआयपर्यंत पोहोचली नाही.