भारत-पाकिस्तान सामन्याला आता आठवड्यापेक्षा कमी वेळ राहिला असतानाही आश्चर्यकारक वळण लागलं आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे अजूनही विकली गेलेली नाहीत. दरवेळी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर काही तासांमध्येच तिकीटं संपतात, यावेळी मात्र चाहत्यांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा उत्साह दिसून येत नाहीये.
अजूनही तिकीट उपलब्ध का?
भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे जगात सर्वाधिक पाहिला जाणारा क्रिकेट सामना. ही मॅच पाहण्यासाठी फक्त टीव्ही आणि मोबाईलच नाही तर स्टेडियमही हाऊसफूल होतात, अनेक वेळा स्टेडियममधल्या सुरक्षा यंत्रणांना गर्दी नियंत्रणात ठेवण्यात अडचणी निर्माण होतात. यावेळी मात्र एकत्रित मॅचची तिकीट विक्री, तसंच प्रीमियम सेवांसह मिळणारी तिकीटं, यामुळे तिकीटांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
advertisement
किती रुपयांना मिळतंय तिकीट?
व्हीआयपी सूट्स ईस्ट: ₹ 2,57,815 (दोन जागांसाठी) - यामध्ये बसण्याची व्यवस्था, अनलिमिटेड फुड आणि ड्रिंक, लाउंज प्रवेश, खाजगी प्रवेश आणि समर्पित शौचालये समाविष्ट आहेत.
रॉयल बॉक्स: ₹ 2,30,700 (दोघांसाठी)
स्काय बॉक्स ईस्ट: ₹ 1,67,851 (दोघांसाठी).
प्लॅटिनम (₹75,659) आणि ग्रँड लाउंज (₹41,153) सारखे मध्यम श्रेणीचे पर्याय देखील महागडे आहेत.
सर्वात स्वस्त पर्याय, जनरल ईस्ट, दोन जागांसाठी ₹ 10,000 च्या जवळपास आहे. वाढलेल्या किंमतीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं विकली जात नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारताचा पहिला सामना
आशिया कपमध्ये टीम इंडिया पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तान त्यांचा पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळेल. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्याची तयारी म्हणून आशिया कपकडे पाहिलं जात आहे.