मुंबई: IPLची लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा परदेशातच होणार आहे. 2026 च्या हंगामासाठी होणारा हा मिनी ऑक्शन 15 ते 18 डिसेंबरदरम्यान दुबई, मस्कट किंवा दोहा या तीन शहरांपैकी एका ठिकाणी होईल.
BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भारतात डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत लग्नसराईचा हंगाम असतो. या काळात जवळपास सर्व मोठ्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर्स लग्नांच्या बुकिंग्सने भरलेले असतात. अशा परिस्थितीत 10 संघांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, मॅनेजर्स आणि ब्रॉडकास्ट टीम यांना एका ठिकाणी सामावून घेणे अवघड ठरते. त्यामुळे बोर्डने या वेळेसही लिलाव परदेशातच करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
advertisement
गेल्या आठवड्यात काही माध्यमांनी या वेळचा IPL लिलाव भारतात होणार असल्याचा दावा केला होता. मात्र मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये IPLचा मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात झाला होता. तेव्हाही भारतात स्थळांची कमतरता आणि लॉजिस्टिक अडचणी ही कारणे देण्यात आली होती.
दुबई सर्वात आघाडीवर
या वेळच्या लिलावासाठी दुबई, मस्कट आणि दोहा ही तीन शहरे चर्चेत आहेत. त्यातही दुबई सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहे. कारण तिथे BCCI आणि IPL फ्रँचायझींसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत आणि भारतीय क्रिकेट बोर्डने मागील काही वर्षांत तिथे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत.
2014 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे IPLचे सुरुवातीचे सामने भारताबाहेर खेळवावे लागले होते. त्या वेळीही UAEलाच प्राधान्य देण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2020 आणि 2021 मध्ये कोविड काळात संपूर्ण IPL स्पर्धा UAEमध्येच पार पडली होती.
मस्कट (ओमान)लाही एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. तिथे BCCIचे चांगले संबंध आहेत आणि छोटासा पण आधुनिक क्रिकेट कॉम्प्लेक्सही आहे. दोहा (कतार) ही मात्र पहिल्यांदाच संभाव्य स्थळ म्हणून चर्चेत आली आहे. ज्यावरून BCCI आता खाडी देशांमध्ये क्रिकेट आणखी मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढील IPL हंगाम 20 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता
BCCIच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पुढील वर्षीचा IPL हंगाम 20 मार्चपासून सुरू होऊ शकतो. बोर्डने 2025 च्या देशांतर्गत हंगामाचा वेळापत्रक लक्षात घेऊन IPL थोडा लवकर सुरू करण्याचा विचार केला आहे. जेणेकरून मेच्या अखेरीपर्यंत संपूर्ण स्पर्धा पूर्ण होईल. त्यामुळे जून-जुलैमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना पुरेसा वेळ मिळेल.
IPL लिलाव आता जागतिक इव्हेंट
IPL आता केवळ भारतीय लीग राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत या स्पर्धेचा लिलावसुद्धा जागतिक स्तरावरील इव्हेंट बनला आहे. फ्रँचायझी मालकांव्यतिरिक्त जगभरातील एजंट, विश्लेषक आणि खेळाडूंचे मॅनेजर्स या कार्यक्रमाचा भाग बनतात. परदेशात लिलाव केल्याने केवळ उत्कृष्ट सुविधा मिळतात असं नाही. तर आंतरराष्ट्रीय माध्यमांचे कव्हरेजदेखील वाढते.
BCCIच्या सूत्रांच्या मते, फ्रँचायझींनाही लिलाव परदेशात होण्याबद्दल काही आक्षेप नाहीत. कारण बहुतेक मालकांचे व्यावसायिक हितसंबंध खाडी देशांमध्ये आधीपासूनच आहेत.