आशिया कपच्या फायनलनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला उपविजेतेपदाचा चेक मिळाला, पण सलमान आघाने हा चेक फेकून दिल्याचा व्हिडिओही समोर आला. एकीकडे पाकिस्तानचे खेळाडू तसंच त्यांच्या क्रिकेट बोर्डावर टीका होत असतानाच आता पाकिस्तानच्या खेळाडूचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो पाकिस्तानच्या सरकारने आपल्याला दिलेला चेक बाऊन्स झाल्याचं म्हणत आहे.
advertisement
खरतर भारतामध्ये चेक बाऊन्स होणे हा फसवणुकीचा गुन्हा मानला जातो, पण पाकिस्तानमध्ये तर चक्क सरकारने खेळाडूंना वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल बक्षीस म्हणून दिलेला चेकच बाऊन्स झाला. पाकिस्तानच्या तत्कालिन पंतप्रधानांनी खेळाडूंना दिलेला हा चेक बाऊन्स झाल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रियाही पाकिस्तानी खेळाडूने दिली आहे.
सईद अजमलच्या दाव्याने खळबळ
'आम्ही 2009 चा वर्ल्ड कप जिंकून आलो, तेव्हाच्या पंतप्रधानांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि आम्हाला 25-25 लाख रुपयांचा चेक दिला. आम्हाला खूप आनंद झाला 2009 साली 25 लाख बरेच पैसे होते. आम्हाला चेक मिळाला, पण तो चेक बाऊन्स झाला. गव्हर्नमेंटचा चेक बाऊन्स झाला. मग ते म्हणाले हा चेक तुम्हाला पीसीबीचे अध्यक्ष देतील, पण अध्यक्षांनी याला स्पष्ट नकार दिला. चेक तुम्हाला तिथून मिळाला आहे, मी का पैसे देऊ? असं पीसीबी अध्यक्ष म्हणाले. आयसीसीकडून आम्हाला जे पैसे मिळाले तेच होते. यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यात आम्ही वाईट पद्धतीने हरलो. त्यानंतर आम्हाला चेकही मिळाला नाही', असं सईद अजमल म्हणाला आहे.