मुंबई: भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी प्रमुख एम. एस. के. प्रसाद (MSK Prasad) यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंची निवड कधीच त्यांच्या नाव, आडनाव किंवा धर्माच्या आधारावर होत नाही. अलीकडेच एका राजकीय वादानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
advertisement
एका नेत्याने असा आरोप केला होता की भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजीत अगरकर यांनी सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे संघातून वगळले आणि हा निर्णय धार्मिक कारणांवर आधारित होता. या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी पुढे येऊन या सर्व आरोपांचे खंडन केले आणि भारतीय क्रिकेट निवड प्रक्रियेचे प्रामाणिक स्वरूप अधोरेखित केले.
प्रसाद हे 2016 ते 2020 या काळात भारतीय निवड समितीचे प्रमुख (Chief National Selector) होते. त्यांनी IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की- निवड समितीने कधीही कोणत्याही खेळाडूविषयी धर्म, जाती किंवा समुदायाच्या आधारे निर्णय घेतलेला नाही. हे कधीच घडणार नाही. जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड होते, तेव्हा आम्ही कधीच त्याच्या समुदाय, प्रदेश किंवा धर्माबद्दल चर्चा करत नाही. मात्र एखादा खेळाडू संघातून वगळला गेला की, तेव्हाच अशा गोष्टी का समोर येतात? सर्वांना ठाऊक आहे की सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि त्याच्या निवडीविषयी जर काही कारण असेल, तर ते निवडकर्ते स्वतः सांगतील. पण या वगळण्यामागे कोणताही धार्मिक किंवा प्रादेशिक दृष्टिकोन असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
ते पुढे म्हणाले की- यामागे काहीतरी ठोस कारण असणार, जे निवड समिती योग्य वेळी स्पष्ट करेल. पण जर कोणी असा विचार करत असेल की एखाद्या खेळाडूला त्याच्या धर्म किंवा आडनावामुळे वगळले गेले, तर त्यांना भारतीय क्रिकेटची खरी जाण नाही. आम्ही कधीच खेळाडूंच्या पार्श्वभूमीचा विचार करत नाही, आमचा एकच निकष असतो खेळाडूची कामगिरी आणि क्षमता. जे लोक या गोष्टींना राजकीय रंग देतात, ते चुकीचे आहेत आणि भारतीय क्रिकेटच्या मूलभूत संस्कृतीचा अपमान करत आहेत.
या वक्तव्यामागचं कारण म्हणजे अलीकडेच झालेला एक राजकीय वाद होय. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी गौतम गंभीर यांच्यावर धार्मिक पक्षपाताचा आरोप केला होता. सरफराज खानला भारत ‘A’ संघातून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वगळल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर (X, पूर्वी ट्विटर) पोस्ट करत विचारलं- सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे निवडले नाही का? फक्त विचारतेय. आम्हाला ठाऊक आहे की या बाबतीत गौतम गंभीर कुठे उभे आहेत. या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आणि राजकीय तसेच क्रिकेट क्षेत्रात चर्चेचा विषय झाला.
एम. एस. के. प्रसाद यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आणि स्पष्ट केले की निवड समिती कधीही कोणत्याही खेळाडूला त्याच्या धर्म, जाती किंवा प्रदेशाच्या आधारावर प्राधान्य देत नाही. ते म्हणाले, आमच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि व्यावसायिकता हेच मुख्य तत्त्व आहेत. भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक निर्णय कामगिरीवर आधारित असतो, कोणत्याही बाह्य घटकावर नाही. त्यांनी पुढे म्हटले की अशा प्रकारचे आरोप केवळ निवड प्रक्रियेबद्दल गैरसमज पसरवतात आणि खेळाडूंच्या मेहनतीचा अवमूल्यन करतात.
भारतीय संघात जागा मिळवायची असेल, तर बॅट आणि बॉलच बोलतात; धर्म, प्रदेश किंवा आडनाव नाही. निवड नेहमी कामगिरीवर होते आणि तेच भारतीय क्रिकेटची ओळख आहे, असे प्रसाद म्हणाले.
