1 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या रात्री इंग्लंडच्या व्हाईट बॉल टीमचा कर्णधार हॅरी ब्रुक वादात सापडला होता. ज्यात नाईट क्लबमध्ये एका बाऊन्सरसोबत त्याची हाणामारी झाली होती. इंग्लंडच्या ऍशेस सीरिजआधी तीन आठवड्यांपूर्वीच हा राडा झाला होता. त्यानंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ब्रुक फक्त 6 रन करू शकला आणि इंग्लंडने सामना गमावला. ही सीरिज इंग्लंडने 3-0 ने गमावली.
advertisement
हॅरी ब्रुकने मागितली माफी
ऍशेसमध्ये इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने दारूण पराभव झाला, त्यानंतर ब्रुकचा न्यूझीलंडमधला वाद समोर आला. यानंतर आता ब्रुकने माफी मागितली आहे. 'मी माझ्या वर्तनाबद्दल माफी मागतो आणि माझे वर्तन अयोग्य होते आणि माझ्यासाठी आणि इंग्लंड टीमसाठी लाजिरवाणे होते, हे मी पूर्णपणे मान्य करतो. इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणे हा एक सर्वोच्च सन्मान आहे, जो मी खूप गांभीर्याने घेतो. माझ्या टीममधील खेळाडू, प्रशिक्षक आणि समर्थकांना निराश केल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. या घटनेतून शिकलेल्या धड्यांवर, विशेषतः जबाबदारी, व्यावसायिकता आणि आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडून अपेक्षित असलेल्या मानकांबद्दल मी मनापासून विचार केला आहे. या चुकीतून शिकण्याचा आणि मैदानावर आणि बाहेर माझ्या भविष्यातील कृतींद्वारे विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा मी निश्चय करतो. मी निःसंशयपणे माफी मागतो आणि हे पुन्हा घडू नये यासाठी कठोर परिश्रम करेन', असं ब्रुक त्याच्या निवेदनात म्हणाला.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाची कारवाई
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रुकला दंड ठोठावल्यानंतर त्याच्याशी दीर्घ चर्चा केल्याचा दावा केला. 'आम्हाला या घटनेची जाणीव आहे आणि ईसीबीच्या औपचारिक आणि गोपनीय शिस्तपालन प्रक्रियेअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित खेळाडूने माफी मागितली आहे आणि या प्रसंगी त्याचे वर्तन अपेक्षित मानकांपेक्षा कमी असल्याचे मान्य केले आहे', असं ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे.
